बेळगाव लाईव्ह:बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कारांची २०२३’ घोषणा करण्यात आली आहे.
सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे या पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्करांकरिता मराठी विभागासाठी सुनील मारुती कोंडूसकर, प्रतिनिधी, दैनिक सकाळ, कोल्हापूर व कन्नड विभागासाठी कुंतीनाथ श्रीमंधर कलमणी, संपादक, दैनिक हळ्ळीय संदेश, बेळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच, ‘प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२३’ करिता मराठी विभागासाठी दुर्वा गजानन दळवी, लोकमत मिडिया नेटवर्क रिपोर्टर, कोल्हापूर व कन्नड विभागासाठी विद्या विलास पाटील, वार्ताहर, दैनिक लोकदर्शन, बेळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार विजेत्या पत्रकारांना रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून त्यांना प्रदान केले जाणार आहे.
पत्रकार पुरस्कार गुरुवार दि. १८-०१-२०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता मराठा मंदिराचे सभागृह, खानापूर रोड, गोवावेस, बेळगाव येथे बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
बॅ. नाथ पै व्याख्यानमाला : प्रा. दवणे गुलफणार पहिले पुष्प
सार्वजनिक वाचनालयातर्फे उद्या गुरुवार दि 18 ते शनिवार दि 20 जानेवारी 2024 या कालावधीत दररोज सायंकाळी 5:30 वाजता बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्याचे उद्घाटनाचे पहिले पुष्प ठाणे (महाराष्ट्र) येथील साहित्यिक व गीतकार प्रा. प्रवीण दवणे हे गुंफणार आहेत.
शहरातील मराठा मंदिर येथे उद्यापासून आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ठाण्याचे साहित्यिक व गीतकार प्रा. प्रवीण दवणे हे गुंफणार असून ‘दीपस्तंभ : जनातले, मनातले’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय असणार आहे. प्रा. प्रवीण दवणे गेली 35 वर्षे मराठीच्या अध्यापनात कार्यरत असून त्यांच्या कविता, गीत रचना, ललित गद्य, कथा, कादंबरी अशा वाङ्मयाच्या विविध प्रकारातील लेखनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या लिखाणाला अनेक पारितोषिकांची मोहर लाभली आहे. पारितोषिक प्राप्त त्यांच्या साहित्य कृतींमध्ये सावर रे, थेंबातलं आभाळ, रे जीवना, आयुष्य बहरताना, आनंदोत्सव, वय वादळ विजांच, स्पर्शगंध, मनातल्या घरात, मैत्रवण, दिलखुलास, रोप अमृताचे, अथांग, अध्यापन आणि नवनिर्मिती, प्रश्न पर्व, स्वानंदघन आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर दे दणादण, थरथराट, झपाटलेला, आम्ही सातपुते, आत्मविश्वास, आयडियाची कल्पना, मी सिंधुताई सपकाळ अशा रोप्य महोत्सवी चित्रपटांसह सुमारे 150 मराठी चित्रपटांना प्रवीण दवणे यांची गीत रचना लाभली आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे प्रवीणजींचे भक्ती गीत वातावरण भरून टाकते, तर अजय अतुल यांच्या संगीतातील ‘चिंब भिजलेले’ हे प्रेम हे सर्वांच्या ओठावर येते. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्य पुरस्कार पाच वर्षे, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार, म. सा. परिषद पुणे यांचा ना. घ. देशपांडे, अल्पगौरव, झी मराठी आणि अलीकडे अक्षर भारती पुणे या संस्थेचा महाकवी कुसुमाग्रज पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रवीण दवणे यांना लाभले आहेत. नुकताच अध्यापन आणि नवनिर्मिती या त्यांच्या ग्रंथास कर्मवीर भाऊराव पाटील राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.