बेळगाव लाईव्ह : अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये श्री रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून जुना पी. बी. रोड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल नजीकच्या श्री रेणुका देवी मंदिरामध्ये येत्या सोमवार दि. 22 जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जुना पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिरामध्ये येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता होम-हवन होणार असून सायंकाळी 5 वाजता 1008 रामनाम जप होईल त्यानंतर सायंकाळी 6 वाजता 1008 दिपपूजन आणि 6:30 वाजता 1008 सुहासिनींची ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमांची सांगता सायंकाळी 7:30 वाजता महाआरतीने होणार आहे. तरी सर्व भाषिक भक्तांनी उपरोक्त कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रेणुका देवी मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.
प्रभू श्रीराम भक्त महिलांतर्फे 22 रोजी शोभायात्रा
अयोध्येमध्ये राम मंदिराचे ऐतिहासिक उद्-घाटन 23 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. यानिमित्त बेळगावातील समस्त प्रभू रामचंद्र भक्त महिलांतर्फे येत्या सोमवारी 22 जानेवारी रोजी सकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या ऐतिहासिक उद्-घाटन सोहळ्यासाठी प्रत्येक महिलेला प्रत्यक्ष अयोध्येत उपस्थित राहणे शक्य नसल्याकारणाने बेळगावातील सर्व रामभक्त महिलांसाठी या शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आपली नैतिक जबाबदारी ओळखून प्रत्येक महिलेने या सोहळ्यात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगावातील समस्त प्रभू रामचंद्र भक्त महिलांतर्फे सोमवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता समर्थ मंदिर, बुधवार पेठ, टिळकवाडी येथून या शोभा यात्रेला सुरुवात होईल. तत्पूर्वी समर्थ मंदिरमध्ये उपस्थित महिला एकत्रितपणे रामरक्षा म्हणतील. त्यानंतर महिला आपापल्या दुचाकी वरून रामदेव गल्लीतील 100 वर्षांपूर्वीच्या श्री राम मंदिरापर्यंत एकत्रितपणे, ‘जय श्रीराम’ चे नारे देत शोभायात्रा काढतील. रामदेव गल्ली श्री राम मंदिरात परत एकदा रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणून शोभायात्रेची सांगता करण्यात येईल.
अयोध्येतील सोहळा हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खूप महत्त्वपूर्ण सोहळा असल्याकारणाने, महिलांनी केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या जरीच्या साड्या नेसून शोभायात्रेत सामील व्हावे. सदर शोभा यात्रेची शोभा वाढवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकीवर असल्याकारणाने त्यांनी आपल्या ओळखीतील महिलांना शोभायात्रेची माहिती द्यावी. रामदेव गल्लीतल्या मंदिराजवळ असलेल्या पार्किंग लॉट मध्ये शोभायात्रेतील महिलांनी आपापल्या दुचाकी पार्क कराव्यात. आयोध्या येथे होणाऱ्या श्री राम जन्मभूमी मंदिराच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण 12 वाजल्यापासून टीव्हीवर थेट प्रक्षेपित होणार असल्याकारणाने तत्पूर्वी शोभायात्रा आटोपायची आहे. तरी सर्व महिलांनी कृपया सकाळी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन बेळगावातील समस्त प्रभू रामचंद्र भक्त महिलावर्गाने केले आहे.
*स्वामी समर्थ आराधना केंद्रात श्री राम जप कार्यक्रम*
बेळगाव -महाद्वार रोड स्थित श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रामध्ये सोमवार दि. 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमीत मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमादिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 8 पर्यंत अभिषेक त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे सहस्त्रनाम पठन, 9 वा.पासून दिवसभर’ श्रीराम जयराम जय जय राम ‘ जप होणार असून सायंकाळी आरती प्रसाद वश्री गुरु कुलकर्णी यांचा सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे .नागरिकांनी या उपक्रमात जमेल त्या वेळात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राचे अध्यक्ष नारायण पाटील व सचिव सुनील चौगुले यांनी केले आहे