बेळगाव लाईव्ह :वंटमुरी गावातील महिलेवर हल्ला करून तिची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. राज्य सरकारने नुकताच तसा आदेश जारी केला आहे.
महिलेच्या विवस्त्र धिंड प्रकरणातील एका अल्पवयीनासह दोघे संशयीत अद्याप फरारी असून मानव हक्क आयोगाने गेल्या शनिवारी पाठवलेल्या नोटिसीनंतर राज्य सरकारने उपरोक्त पाऊल उचलले आहे.
बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावात एका 42 वर्षीय महिलेला मारहाण करण्याबरोबरच विवस्त्र करून धिंड काढण्याद्वारे विजेच्या खांबाला बांधण्यात आले होते. याप्रकरणी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने कर्नाटकचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना गेल्या शनिवारी नोटीस बजावून चार आठवड्यात सविस्तर अहवाल मागवला आहे. त्यामध्ये गुन्हा नोंदवण्याची स्थिती, तपासातील प्रगती, अटक, नुकसान भरपाई, जर पैसे दिले असतील तर आणि राज्यात अशा घटना रोखण्यासाठी कोणती पावले उचलली किंवा उचलली जावीत याचा समावेश असावा असे सुचित करण्यात आले आहे.
दरम्यान, काकती पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केली असून फरारी असलेल्या तिघा जणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान आता या प्रकरणाला नवे वळण लागले असून तपासाची जबाबदारी सीआयडीकडे सोपवण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. त्यानुसार बेळगाव पोलिसांनी बेंगलोरला सीआयडी कार्यालयात जाऊन प्रकरणाच्या फाइल्स तपास अधिकारी गिरीश यांच्याकडे सोपविल्या आहेत. सीआयडीचे पथक येत्या दोन दिवसात बेळगावमध्ये दाखल होण्याची व चौकशी सुरू करण्याची शक्यता आहे.