बेळगाव लाईव्ह:कर्नाटक सरकारच्या बेळगाव ते कन्याकुमारी आणि पुन्हा परत बेळगाव अशा कर्नाटक ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’ सेवेला येत्या 18 जानेवारी 2024 रोजी प्रारंभ होत आहे.
आयआरसीटीसीच्या सहकार्याने कर्नाटक सरकारने उत्तरेतील काशी, प्रयाग, गया आणि अयोध्या या धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी भारत गौरव पर्यटन रेल्वे सुरू केली आहे.
सदर 700 पर्यटक प्रवास करू शकतील इतक्या क्षमतेच्या या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित तू टायर व थ्री टायर अशा संमिश्र कोचीस आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे सेवेचा लाभ घेणाऱ्या यात्रेकरूंना कर्नाटक सरकारकडून सवलतही दिली जाते.
बाह्यांगावर भारतातील प्रसिद्ध स्मारक शिल्पे, भारतीय नृत्य प्रकार आदींची चित्रे रेखाटलेल्या आणि सुरेख रंगरंगोटी केलेल्या या रेल्वेमध्ये उत्तम ताज्या भोजनासह इतर अन्य सुविधा उपलब्ध आहेत.
उत्तरेतील या आरामदायी सुखकर प्रवास घडवणाऱ्या या रेल्वे प्रमाणे आता कर्नाटक सरकारकडून दक्षिणेतील कन्याकुमारी पर्यंतच्या विविध धार्मिक स्थळांना भेटी देणारी कर्नाटक भारत गौरव पर्यटन रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
सदर रेल्वे पहिल्या दिवशी म्हणजे येत्या 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता बेळगाव येथून प्रस्थान करणार आहे. त्यानंतर धारवाड येथे 10:03 वाजता दोन मिनिटांचा थांबा घेऊन ती पुढे मार्गस्थ होणार आहे.
आपल्या संपूर्ण प्रवासादरम्यान ही रेल्वे दक्षिण भारतातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. सदर रेल्वेचा बेळगाव पर्यंतचा परतीचा प्रवास सहाव्या दिवशी समाप्त होईल.