बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात विशेष करून उपनगरात घरोघरी घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा मंदिरांकडे वळविला असून राजारामनगर, उद्यमबाग येथील श्री दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी तिच्यातील सर्व पैसे लंपास केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
सदर चोरीचा प्रकार काल शुक्रवारी मध्यरात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. चोरट्यांनी लोखंडी रॉडने दानपेटीचे कुलूप उचकटून काढून आतील पैशावर डल्ला मारला. मंदिरामधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरीचा सर्व प्रकार कैद झाला असून त्यात एक चोरटा लोखंडी रॉडने महत्प्रयासाने दानपेटीचे कुलूप तोडत असल्याचे पहावयास मिळते.
नुकत्याच झालेल्या श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली होती. चोरट्यांनी किती रक्कम लांबविली हे निश्चितपणे समजू शकले नसले तरी 90 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दानपेटीत जमा झाली असावी असा अंदाज आहे. सदर चोरीचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला.
याबाबतची माहिती मिळताच उद्यमबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य हाती घेतले. दरम्यान श्री दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरतात घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अशोक नार्वेकर यांनी राजारामनगर ‘ए’ उद्यमबाग येथील श्री दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि सवडीने दानपेटीतील रक्कम मोजली जाणार होती. मात्र काल मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून सर्व पैसे लंपास केले आहेत असे सांगून पोलीस खात्याने या चोरीचा तपास तर लावावाच शिवाय शहरातील सर्व मंदिराच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली.
याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री दत्त मंदिरातील चोरी प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.