बेळगाव लाईव्ह :केlरळमध्ये जेएन-1 कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्यामुळे कर्नाटकातील विविध जिल्ह्यात सतर्कता बाळगण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातही आरोग्य खात्याने पूर्व खबरदारी घेतली असून जिल्ह्यातील संशयित रुग्णांची कोरोना चांचणी काल शुक्रवारपासून सुरू झाली आहे.
जिल्हा आरोग्य खात्याकडे 7000 हून अधिक कोरोना चाचणी किट उपलब्ध असून बेळगाव आणि चिक्कोडी अशा दोन विभागात आरोग्य खात्याकडून कोरोना चांचणी सुरू झाली आहे. चिक्कोडी विभाग महाराष्ट्राला जवळचा असल्याने या ठिकाणी अधिक चांचण्या घेतल्या जात आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने आदी ठिकाणी सारी आणि कोरोना संबंधित इतर लक्षणे आढळून आल्यास रुग्णांची आरटीपीसीआर चांचणी करावी, अशी सूचना आरोग्य खात्याकडून सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या गुरुवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील, मनपा आयुक्त, आरोग्य खाते आणि बिम्सची बैठक झाली होती.
त्यावेळी शुक्रवारपासून चांचणी सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात संशयीतांची करुणा चांचणी सुरू झाली आहे.
चिक्कोडी विभागात कोरोना चांचणी वाढविण्यात आली आहे. शासनाने अद्याप कोणतेही निर्देश दिले नसल्याने आंतरराज्य तपासणी नाक्यांवर प्रवाशांची चांचणी सुरू केलेली नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणे यांनी सांगितले आहे.