बेळगाव लाईव्ह:भारतीय लष्कराने 1971 च्या बांगलादेश मुक्ती लढ्यात मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ 16 डिसेंबर हा ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज या विजय दिवसानिमित्त मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे आयोजित ‘सदर्न स्टार विजय रन’ ही भव्य मॅरेथॉन शर्यत उस्फुर्त प्रतिसादात पार पडली.
बेळगाव लष्करी केंद्राच्या ठिकाणी आज शनिवारी सकाळी आयोजित सदर्न स्टार विजय रनमध्ये 1356 सेवा कर्मचारी, 20 ज्येष्ठ नागरिक, 200 नागरिक आणि 350 मुल-मुली अशा एकूण 1926 मॅरेथॉन धावपटूंनी भाग घेतला होता.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) या बेळगावच्या लष्करी केंद्राचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून शर्यतीचा शुभारंभ केला. सदर्न स्टार विजय रन मॅरेथॉन शर्यत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एमएलआयआरसीच्या अधिकारी व जवानांनी विशेष परिश्रम घेतले.
शर्यतीचे उद्घाटन करण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले की, सदर्न स्टार विजय रन ही मॅरेथॉन शर्यत सदर्न कमांड, पुणे यांच्यावतीने आज संपूर्ण देशात जसलमेरपासून कन्याकुमारीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
आज भारतीय लष्कराचा विजय दिवस आहे. 1971 मध्ये या दिवशी आमच्या लष्कराने बांगलादेश मुक्ती लढा जिंकला होता. त्यावेळी लढाई शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आज आम्ही ही मॅरेथॉन शर्यत बेळगाव लष्करी केंद्राच्या ठिकाणी आयोजित केली आहे. मला आनंद वाटतो की या रनमध्ये सहभागी होण्यासाठी जवळपास 2 हजार धावपटू येथे आले आहेत. यामध्ये शहरातील नागरिक, शाळा -महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी अशा सर्वांचा सहभाग आहे.
ही सदर्न स्टार विजय रन मॅरेथॉन 12, की.मी., 6 की.मी. आणि 5 की.मी. अशा तीन गटात घेतली जाईल यामध्येही पुरुष, वयस्कर मंडळी, महिला आणि मुले असे गट करण्यात आले आहेत. या शर्यतीतील पहिल्या 10 क्रमांकाच्या विजेत्यांना पदक व प्रशस्तीपत्र दिले जाईल. त्याचप्रमाणे पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्याला रोख पारितोषिकही दिले जाईल, अशी माहिती ब्रिगेडियर मुखर्जी यांनी दिली.