बेळगाव लाईव्ह:बेळगाव रेल्वे स्थानकाच्या इमारतीच्या दर्शनीयभागात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पा समोरील दिशादर्शक फलक तात्काळ हटविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
समस्त हिंदुत्व प्रेमींसह हिंदू व दलित संघटनांनी जोरदार आवाज उठविल्यानंतर बेळगाव रेल्वे स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प उभारण्यात आली आहेत. ही बाब स्वागतार्ह असली तरी अलीकडे या शिल्पांसमोर रेल्वे स्थानक इमारतीच्या आधुनिकीकरणाची छायाचित्रे आणि रेल्वे मार्गांचा विकास दर्शवणारा फलक बसविण्यात आला आहे.
या फलकामुळे सदर दोन्ही महापुरुषांच्या शिल्पांचे दर्शन घडण्याएवजी ती झाकली जात आहेत. प्रशस्त अशा रेल्वे स्थानक आवारात अन्य मोक्याच्या जागा असताना सदर फलक नेमका शिवराय आणि डॉ. आंबेडकर यांच्या शिल्पांसमोर बसविण्यात आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे सदर फलक तात्काळ हटवून अन्यत्र उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
काही महिन्यापूर्वी आंदोलन केल्याने दोन्ही थोर पुरुषांचे फलक रेल्वे स्थानकावर लागलें होते मात्र सदर दोन्ही शिल्प कायम स्वरुपी करावी अशीही मागणी यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.