बेळगाव लाईव्ह -” तळागाळातील माणसाला जगविण्याचे काम झाले पाहिजे, त्याच्या हाती पैसा आला पाहिजे, असे झाले तरच खरोखर या देशाचा विकास झाला आणि खऱ्या अर्थाने देश ताकदवान बनला, बळकट झाला असे म्हणता येईल. असे विचार माजी केंद्रीय कायदामंत्री आणि गोव्याचे जेष्ठ नेते रमाकांत खलप यांनी बोलताना व्यक्त केले. येथील सुवर्ण लक्ष्मी सहकारी सोसायटीच्या रौप्य महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की”आज देश पुढे जातोय ,भरपूर प्रगती करतोय ,म्हणजेच या देशातील नागरिकांचा विकास होतोय, हा विकास होण्यासाठी बँका आणि सहकारी सोसायटी यांचा हातभार लागला आहे. सुवर्ण लक्ष्मी सोसायटीच्या संचालकांनी अत्यंत निष्ठापूर्वक आणि काटेकोरपणे लक्ष देऊन ही संस्था उभारलेली आहे. सुवर्ण लक्ष्मी सोसायटी सारख्या सहकारी संस्थामुळे गावातील मंडळी स्वतःच्या पायावर उभी राहतात आणि त्यामुळे अर्थकारणाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो सध्या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन कडे नेण्याचा सरकारचा विचार आहे त्यामध्ये अशा संस्थांचा खारीचा वाटा आहे” असेही ते म्हणाले.
भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री रमाकांत खलप तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सुवर्णलक्ष्मीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर हे होते. व्यासपीठावर कोल्हापूरच्या विश्वकर्मा सोसायटीचे अध्यक्ष प्रा. एकनाथ चोडणकर, महिला विद्यालय मंडळाचे सचिव अॅड विवेक कुलकर्णी, सहकारी सोसायटीचे सहनिबंधक राजेंद्र पाटील आदी पाहुण्यांसह संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर व संचालक विनायक कारेकर, प्रकाश वेर्णेकर ,दीपक शिरोडकर, समर्थ कारेकर, राजू बांदिवडेकर, माणिक सांबरेकर ,मधुरा शिरोडकर, स्नेहल सांबरेकर, सुरेश पाटील व सेक्रेटरी अभय हळदणकर उपस्थित होते.
रमाकांत खलप पुढे म्हणाले की ‘बेळगाव आणि गोवा यांचे नाते अतिशय जवळचे असून गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात बेळगावकरांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. बॅरिस्टर नाथ पै, याळगी कुटुंबीय, बाबुराव ठाकूर यांच्यासह अनेकांनी या लढ्यात स्वतःला झोकून देऊन जे काम केले ते गोवा विसरत नाही. गोव्यात शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे गोव्यातून माझ्यासह अनेक जण बेळगावातून शिकले. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याला साठ वर्षे पूर्ण झाली या स्वातंत्र्य लढ्यासाठी जी मदत बेळगावकरांनी केली ती लाख मोलाची आहे ‘असे सांगून रमाकांत खलप यांनी सुवर्णलक्ष्मी सोसायटीच्या कार्याचा गौरव केला.
प्रा. एकनाथ चोडणकर यांच्या हस्ते रौप्य महोत्सवानिमित्त निमित्त सादर करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. “सभासद, ठेवीदार ,कर्मचारी वर्ग- संचालक मंडळ व कर्जदार अशा चौघांनी मिळून पतसंस्थेचा कारभार चालतो. या सर्वांचा पाठिंबा आणि सहकार्य असल्यामुळेच ही संस्था प्रगतीपथावर आहे. असे विचार त्यांनी बोलताना व्यक्त केले.
“एखादी संस्था विश्वासावर चालते, या संस्थेची आर्थिक स्थिती पाहता या सोसायटीचा कर्मचारीवर्ग आणि संचालक मंडळ यांनी प्रामाणिकपणे आणि एकीने कार्य केल्यामुळेच या संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली आहे”असे सांगून रवींद्र पाटील म्हणाले की “आता पर्यंत आर बी आय च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बँकांच्या ठेवीवर पाच लाखाचे विमा संरक्षण मिळते पण यापुढे सहकारी सोसायटीमधील तीन लाख पर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची योजना कर्नाटक सरकार आखीत आहे” अशी माहीतीही श्री रवींद्र पाटील यांनी दिली.
या संस्थेचे कार्य हे कायद्याला धरून आणि समाजाशी निगडित सुरू आहे असेही ते म्हणाले
अॅड विवेक कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना संस्थेची कार्यपद्धती व कर्मचारी वर्गाचे काम सचोटीचे असल्यामुळेच या संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे असे सांगून या संस्थेशी मी सुरुवातीपासून निगडित आहे असे ते म्हणाले.
प्रारंभी सौ कविता मोदगेकर यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्री गणेश मूर्ती पूजन आणि सुवर्णलक्ष्मी मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर चेअरमन व संचालक मंडळाच्यावतीने पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. व्हा. चेअरमन विजय सांबरेकर यांनी प्रास्ताविक केले तर चेअरमन विठ्ठल शिरोडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. सभासद कर्मचारी आणि संचालक मंडळ या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही या संस्थेची प्रगती करू शकलो असा गौरव पूर्ण उल्लेख त्यांनी केला.
https://x.com/belgaumlive/status/1736394697487348151?s=20
रौप्य महोत्सवानिमित्त आलेल्या शुभेच्छा पत्रांचे वाचन सौ प्रियांका कारेकर यांनी केले. अनेक व्यक्ती व संस्थांच्या वतीने सुवर्णलक्ष्मी च्या संचालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने संस्थेला आजवर सहकार्य केलेल्या
अनेक मान्यवरांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संचालिका सौ.मधूरा शिरोडकर यांनी केले. रौप्य महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.