बेळगाव लाईव्ह:सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढूली आहे. रविवारी डोंगरावर दोन लाख भाविक होते. तर सोमवार आणि मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस ही संख्या चार लाखावर पोहणार आहे. सायंकाळी देवीचा कंकणविधी विसर्जन सोहळा पार पडणार आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश व केरळ येथील भक्तांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे.या यात्रेला कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील भाविकांची उपस्थिती असणार आहे. यात्राकाळात भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थान समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी, स्वच्छता, पोलिस बंदोबस्त तसेच दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.
सीमाभागातील भाविकांना विना अडथळा दर्शनासाठी संधी देण्यात आली आहे. देवीचे यात्रा काळात दर्शन घेण्यासह सामूहिक पडली भरण्यासाठी भाविक येतात. मंदीराकडे प्रवेश करणार्या प्रत्येक मार्गावर पोलीसांच्या सहकार्याने अतिरिक्त तपासणी नाके उभारले असून पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे. करोनाचा संसर्ग जरी वाढलेला असला तरी महाराष्ट्रातील भाविक म्हणून येथे कोणतीही विशेष तपासणी होणार नसून कर्नाटकातील भविकांप्रमाणेच सर्वांना दर्शन दिले जाणार आहे.
भाविकांसाठी या ठिकाणी आरोग्य सहायकांची नियुक्ती देखील करण्यात आली असून पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. देवदासची प्रथा घडू नये यासाठी मंदिर आणि जोगणभाव परिसरात महिला आणि बालकल्याण खात्याचे पथक लक्ष ठेवून आहे. मंगळवारी देवीचा मंगळसूत्र विसर्जन विधी पार पडणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील भाविक डोंगरावरून घराकडे परतणार आहेत. तर पुढील महिन्याच्या पौर्णिमेपासून बेळगाव जिल्ह्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी रवाना होतील. त्यादृष्टीने देखील आतापासूनच सर्व तयारी केली जात आहे.