बेळगाव लाईव्ह :रिमोट कंट्रोलचा वापर करून इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये 50 किलोच्या पोत्यातील 7 ते 8 किलो वजनाची काटामारी करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या हस्तकाला शेतकऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना कापोली (ता. खानापूर) येथे घडली आहे.
खानापूर तालुक्यातील एक दलाल वजा व्यापारी गेल्या दोन वर्षापासून गुंजीसह आजूबाजूच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे भात खरेदी करतो. त्याच्याकडून धान्य खरेदी करताना वजनात काटामारी केली जात असल्याचा आरोप होत होता.
सदर आरोपात तथ्य असल्याचे काल शुक्रवारी खानापूर तालुक्यातील कापोली येथील देसाई यांच्या शेतातील खळ्यात भाताचे वजन करताना स्पष्ट झाले. जेंव्हा संबंधित व्यापाराचा हस्तक आपल्या लांब बाहेरच्या अंगरख्यात रिमोट लपवून वजनामध्ये तफावत करत असल्याचे दृष्टीस पडेल.
रिमोट कंट्रोलद्वारे इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये 50 किलोच्या पोत्यातील 7 ते 8 किलो वजनाची काटामारी केली जात असल्याचे लक्षात येताच देसाई यांनी इतर शेतकऱ्यांना आपल्या खळ्यात बोलावून घेतले. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या हस्तकाला धारेवर धरून त्याची चांगलीच झाडाझडती घेतली.
रिमोट ताब्यात घेऊन शेतकऱ्यांनी त्या हस्तकाला जाब विचारला असता मालकाच्या सांगण्यावरून आपण काटामारी करत असल्याची कबुली त्याने दिली. याबाबतची माहिती मिळताच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते आप्पासाहेब देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, गेल्या वर्षी राजहंसगड, येळ्ळूर येथे अशाच प्रकारचा काटामारीचा प्रयत्न झाला होता. मात्र जागरूक शेतकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडत त्या दलालास पकडून चांगलीच समज दिली होती. मात्र तरीही व्यापारी /दलालांकडून काटामारी करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
आधीच शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे. त्यात अशा पद्धतीने काटामारी होऊ लागली तर शेतकरी जगणार कसा? तेंव्हा सरकारने याप्रकरणी जाणीवपूर्वक गांभीर्याने लक्ष घालून काटामारी करणाऱ्या व्यापारी /दलालावर कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचे शेतकरी नेते राजू मरवे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना व्यक्त केली.