बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या गॅरंटी योजनांचे समर्थन करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक भाजपला राज्यातील काँग्रेस सरकारला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सुवर्ण विधानसौध येथे 4 ते 15 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनात भाग घेण्यासाठी बेळगाव विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
गॅरंटी योजनांची घोषणा केल्यानंतरच तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकले आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील गॅरेंटी योजनांचे आश्वासन दिल्यामुळे ते त्या ठिकाणी जिंकले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील गॅरंटी योजनांचे समर्थन केले. कर्नाटकात गॅरंटी योजनांची घोषणा केल्यामुळे काँग्रेस जिंकले नव्हते तर समाजातील दिनदलित, गोरगरीब अशा सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे जिंकले होते. केवळ विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी भाजपला सहा महिने लागले असल्यामुळे त्यांना आमच्या सरकारला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून पत्रकारांच्या अन्य प्रश्नांचे निरसन केले.
दुसरीकडे भाजपचे आणि विरोधी पक्षाचे नेते आर अशोक यांनी राज्य सरकारवर टीका करताना कर्नाटक राज्य सरकारने अद्याप टेकऑफ घेतले नसल्याचे सांगितले. ते देखील बेळगावात अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी आले असता प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. दुष्काळ पिडितांना मदत करण्यास सरकार मागेपुढे पाहत आहे.
याखेरीत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासही सरकारने म्हणावा तसा पुढाकार घेतलेला नाही असे सांगून कर्नाटक सरकारच्या योजनांची जाहिरात तेलंगणा येथील वर्तमानपत्रात करण्यात आली आहे. पैसे कर्नाटकाचे आणि काम तेलंगणाचं केलं जात आहे, अशी टीकाही आर. अशोक यांनी केली.