बेळगाव लाईव्ह:विक्री जाहिरात कर्मचाऱ्यांचा (सेवा अटी) कायदा 1976 चे रक्षण करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक स्टेट मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशनतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र सरकारने प्रामुख्याने विक्री जाहिरात कर्मचाऱ्यांचा (सेवा अटी) कायदा 1976 चे रक्षण करावे या मागणीच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय विक्री जाहिरात कर्मचारी आणि प्रतिनिधींकडून (मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हस) आज 20 डिसेंबर रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने कर्नाटक स्टेट मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशन बेळगाव शाखेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आज संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निदर्शने केली. त्याचप्रमाणे बेळगाव शाखेचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. याप्रसंगी सेक्रेटरी सुजय पाटील, संदेश पाटील, मंगलदास मेसता, शितल अनगोळकर, विशाल शहापुरी, सदाशिव बापट आदी बरेच विक्री जाहिरात कर्मचारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर निवेदनाद्वारे विक्री जाहिरात कर्मचाऱ्यांचा (सेवा अटी) कायदा 1976 चे रक्षण करावे. विक्री जाहिरात कर्मचाऱ्यांसाठी वैधानिक कामकाजाचे नियम तयार केले जावेत. औषध आणि वैद्यकीय उपकरणांचे दर कमी करण्याबरोबरच त्यांच्यावरील वस्तू सेवा कर (जीएसटी) रद्द करावा. माहिती गोपनीयतेचे संरक्षण केले जावे, अशा मागण्या तपशिलासह केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे विक्रीशी संबंधित छळ आणि एखाद्याला बळीचा बकरा बनवणे बंद करावे, ट्रॅकिंग आणि पाळत ठेवण्याद्वारे गोपनीयतेत घुसखोरी नको. कामाच्या ठिकाणी विना अडथळा प्रवेश सुनिश्चित करावा, अशा नियोक्त्याकडे केलेल्या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.