बेळगाव लाईव्ह :बीएएमएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या बाबतीत पारंपारिक वैद्यांच्या मुलांवर होणारा अन्याय दूर करावा या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्या पारंपारिक वैद्य परिषद कर्नाटक या संघटनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांच्याकडे केल्या आहेत.
पारंपारिक वैद्य परिषद कर्नाटक या संघटनेतर्फे आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथे धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात विविध जिल्ह्यातील स्त्री पुरुष पारंपारिक वैद्य बहुसंख्येने सहभागी झाले होते.
बीएएमएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या बाबतीत पारंपारिक वैद्यांच्या मुलांवर होणारा अन्याय दूर करण्याबरोबरच हा अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसह पारंपारिक वैद्य व्यवस्थेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पारंपारिक वैद्य विकास मंडळाची स्थापना केली जावी. पारंपारिक वैद्यांच्या राज्यस्तरीय संमेलनासाठी राज्य सरकारने प्रतिवर्षाच्या अर्थसंकल्पात अनुदानाची तरतूद करावी. पारंपारिक वैद्यांना रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक वनौषधी आणण्यासाठी अरण्यात वावरण्याची परवानगी दिली जावी.
कोणतीही अपेक्षा न ठेवता पारंपारिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या वैद्यांना मासिक 5000 रुपये मानधन दिले जावे. पारंपारिक वैद्यांनी तयार केलेल्या औषधाची केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेमध्ये चांचणी करून ते प्रमाणित केले जावे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 ते 50 एकर जमिनीत धन्वंतरी वनाची निर्मिती केली जावी. त्या ठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन केले जावे.
त्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुका पंचायतीच्या नावे 5 एकर जमीन मंजूर केली जावी. पारंपारिक वैद्य सेवा करू इच्छिणाऱ्या वैद्यनाथ आयुष्य खात्याकडून आवश्यक प्रशिक्षण देण्याबरोबरच पारंपारिक वैद्य परिषद कर्नाटकला अनुदान दिले जावे आदी मागण्यांचा मंत्री दिनेश गुंडुराव यांना सादर केलेल्या निवेदनात समावेश आहे.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पारंपारिक वैद्य डाॅ. काडय्या स्वामी हिरेमठ म्हणाले की, आम्हा पारंपारिक वैद्यांच्या मुलांना बीएएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्राधान्याने प्रवेश देण्याऐवजी काही अधिकारी पैसे खाऊन दुसऱ्या मुलांना प्रवेश देत आहेत. खानापूरचे पीडीओ आणि बेळगावच्या आयुष अधिकाऱ्यांकडून हे गैरकृत्य होत आहे. राज्य व केंद्र सरकारचे हे अधिकारी मिळवून आमच्या मुलांच्या अधिकारावर गदा आणत आहेत असा आरोप करून आमच्या मुलांवर अन्याय होऊ नये. त्यांचा बीएएमएससाठी प्राधान्याने विचार केला जावा. तसेच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत असे डॉ. हिरेमठ यांनी सांगितले.
हुबळीच्या पारंपरिक वैद्य सविता म्हणाल्या की, पारंपारिक वैद्यांच्या मुलांना बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्राधान्याने प्रवेश देण्याऐवजी इतरांना दिला जात आहे. एका पीडीओ आणि आयुष्य अधिकाऱ्यांमुळे हे घडत आहे. यासंदर्भात यापूर्वी आम्ही संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना निवेदन दिले आहे. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झालेली नसल्यामुळे आज पुन्हा आम्ही आंदोलन सुरू केले आहे. बीएएमएस अभ्यासक्रमात आमच्या मुलांना प्राधान्याने प्रवेश दिला जावा. तसेच आमच्या मुलांवर अन्याय करणाऱ्या संबंधित पीडीओ आणि आयुष्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे.