बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा मराठी शाळेने आईच्या भाषेत हजारो विद्यार्थी घडवले.त्या शाळेच्या ऋणात बांधील राहण्यासाठी आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी, मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.
हलगा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 140 व्या वर्धापन दिनी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निवृत्त शिक्षक वाय एम सामजी होते. या वेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी शाळेला 40 बेंच मदत केली. शाळेच्या आजी माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा सुधारणा समिती आणि माजी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आला.
शाळेची इमारत जरी दुसरी असली तरी जुन्या आठवणीचे रेशमी बंध परत उलगडत बहुतांश जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.उपस्थित निवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षिका सोबत मनसोक्त चर्चा केली.
यावेळी जुन्या आठवणी ताज्या करत जवळजवळ अनेक वर्षांनी भेटलेले जुन्या काळातील सवंगडी आपल्या गत आयुष्याला उजाळा देत होते. एकमेकांच्या पुसट झालेल्या ओळखी परत नवीन केल्या जात होत्या, आपण घालवलेले जुने ते क्षण दिवस, जुने स्नेहबंध यांचं परत एकदा उजळणी करत होते. प्रत्येकाच्या डोळ्यात एक आगळी चमक होती, आनंद होता प्रत्येकाला वाटत होतं की हा गेलेला काळ मध्ये नव्हताच काय? या सगळ्यांना कालचा दिवस आपण दप्तर घेऊन घरी गेलो आज परत एकदा शाळेत आलो अशा पद्धतीचं शाळेतलं वातावरण तयार झालं होतं.
असे काहीसे चित्र हलगा गावच्या माळ रानावर असलेल्या शाळेच्या पठांगणात निर्माण देखील झाले होते. या कार्यक्रमासाठी अनेक जण पर गावाहून आले होते त्यांना घालवलेल्या वेळाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळत होते.
या शाळेतील माजी विद्यार्थी कुणी शिक्षक झाला होता,कुणी इंजिनिअर कुणी सी ए तर कुणी वकील तर कुणी शासकीय अधिकारी कुणी पत्रकार उद्योजक पण काय कोणी काय आयुष्याच्या जगण्याच्या धकाधकीत अनेक पावलं पुढे गेलेली ही सगळी मंडळी आपलं संचित शोधत परत आली होती. केवळ आपल्या लहान पणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठीचं! काय हवं होतं त्यांना? ते क्षण जे त्यांच्या आयुष्यात मनात कुठेतरी रुजलेले होते सगळेच काही अनोखं होत, सगळ्यांना वय विसरायला लावणारे क्षण होते.. जगण्याची ऊर्जा निर्माण करणार होतं वाढलेलं वय विसरायला होणार होतं.
ज्यावेळी आयुष्यात कठीण प्रसंग येतात त्यावेळी हवे असते, आपल्या हृदयाची गोष्ट दुसऱ्याला सांगण्यासाठी ची ती जागा, आपले स्वभाव काय आपण उघडे बागडे कसे असतो हे सगळं सांगणारे असतात ते बालपणीचे मित्र, आपल्या मनाला उभारी देणारे आपल्याला तारुण्य देणारे आणि आपले बालपण परत जगवणारे असतात त्यांनी उघडून दाखवण्यासाठी शेकडो माजी विद्यार्थी एकत्र आले होते.