Saturday, July 27, 2024

/

मच्छे बाल शिवाजी वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवास प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :”आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देणारी माणसेच यशस्वी होतात .आपल्या देशाची लोकसंख्या 143 कोटी असली तरीही प्रत्येक व्यक्ती एकसारखी नाही ,मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये काही वेगळे कौशल्य व गुण आहेत.

शिक्षण आणि वाचनामुळे ही कौशल्य व गुण विकासित करता येतात. त्यासाठी वाचनालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बरोबर 50 वर्षांपूर्वी आम्ही स्थापन केलेल्या या वाचनालयाने माझ्या गावच्या अनेक तरुणांना घडविले. याचा मला सार्थ अभिमान वाटतो” असे विचार मच्छे येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक  अनंत लाड यांनी बोलताना व्यक्त केले.

या वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा गेल्या सोमवारी प्रारंभ झाला. त्यानिमित्त सुवर्ण महोत्सवी वर्षाचा पहिला कार्यक्रम वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष  संतोष जैनोजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर आणि शांताई वृद्धाश्रमाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, तर वक्ते म्हणून मच्छे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री पी पी बेळगावकर हे होते.

आपल्या ओघवत्या वाणीत अनंत लाड यांनी वाचनालयाच्या सुरुवातीच्या काळातील आणि त्यानंतरच्या प्रगतीतील अनेक टप्प्यांचा आढावा घेतला.Krishna

ते म्हणाले की “4 डिसेंबर 1973 रोजी आम्ही केवळ 11 पुस्तकांच्या सहाय्याने या वाचनालयाची स्थापना केली. प्रारंभीच्या काळात दत्तात्रय कणबरकर यांच्या दुकानात त्यानंतर भोमाणी लाड यांच्या कट्ट्यावरील खोलीत व नंतर अनगोळकर स्वामीजींच्या सहकार्याने कलमेश्वर मंदिरातील खोलीत हे वाचनालयाने स्थलांतरित केले. त्या वाचनालयाने बघता बघता पन्नास वर्षाचा टप्पा गाठला. या वाचनालयातील ग्रंथांचा उपयोग करून घेऊन आज अनेक तरुण देशाच्या विविध भागात प्रगतीपथावर आहेत ही अभिमानाची बाब आहे” असेही ते म्हणाले.

माझे सुरुवातीच्या काळातील अनेक सहकारी आज या समारंभात उपस्थित आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या अडचणीवर नियोजनपूर्वक मात करणारी माणसेच आयुष्यात यशस्वी होतात हे सांगताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेकांची उदाहरणे देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय मोरे यांनी वाचनालयाने केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यकाळात या वाचनालयाद्वारे असे अनेक साहित्यिक व सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने असलेली तरुण-तरुणींची उपस्थिती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बेळगावकर सर यांनी तरुणांना व्यसनापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला. पुस्तकाची मैत्री धरा , आधुनिक शिक्षण पद्धतीची कास धरा त्यासाठी वाचनालयात या असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला.तरुणांनी वडीलधाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. व्यासपीठावर उपस्थित असलेले जेष्ठ वाचक कृष्णा अनगोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.Lad sir

कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष जैनोजी यांनी यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण विविध उपक्रम राबविणार आहोत त्यामध्ये बालसाहित्य संमेलन व इतर व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच परिसरात बंद पडलेली वाचनालय पुनर्जीवित करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलींच्या लोकगीत आणि पोवाडे गायनाने झाली. उपस्थितांचे स्वागत संतोष जैनोजी यांनी केले. व्यासपीठावर सुवर्ण महोत्सव समितीचे उपाध्यक्ष बजरंग धामणेकर ,सचिव अरुण कुंडेकर याचबरोबर वाचनालयाचे उपाध्यक्ष वासुदेव लाड ,सचिव गजानन मुजुकर हेही व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते.
दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर विविध ग्रंथांचे पूजन करण्यात आले अध्यक्षांच्या हस्ते पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह व रोपटी देऊन तर व्यासपीठावरील मान्यवरांचा तसेच संस्थेच्या सुरुवातीच्या काळातील संचालकांचा पाहुण्यांचे हस्ते विविध रोपटी व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक चौगुले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.