बेळगाव लाईव्ह :सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था असलेल्या लोकसभेत आंदोलनकर्ते घुसण्याच्या आज घडलेल्या धक्कादायक घटनेचे पडसाद बेळगाव येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत.
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या लोकसभेतील त्या घटनेनंतर अधिवेशन सुरू असलेल्या बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधची सुरक्षा व्यवस्थाही दक्ष झाली आहे. सदर घटनेवर आज विधानसभेतही चर्चा झाली आहे. लोकसभेतील घटनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लोकसभेत घडलेली घटना निषेधार्थ असल्याचे सांगितले.
कोणीही या घटनेच्या समर्थन करणार नाही. सदर घटनेनंतर लोकसभेतील सर्वजण सुरक्षित आहेत ही समाधानाची बाब आहे सुरक्षा व्यवस्थेच्या चुकीमुळे सदर घटना घडल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेची निःपक्षपाती चौकशी करून या घटनेमागील संपूर्ण सत्य देशासमोर आणणे हे केंद्र सरकारचे विशेष करून केंद्रीय गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे.
लोकसभेतील घटनेपासून आपल्यालाही धडा घ्यावा लागेल असे सांगून आता यापुढे सर्वसामान्य जनतेला पास देताना आमदारांना दक्षता आणि काळजी घ्यावी लागेल.
त्यांनी खात्रीशीर आणि ओळखीच्या लोकांनाच पास द्यावा, अशी सूचना सिद्धरामय्या यांनी केली. दरम्यान लोकसभेत आज घडलेल्या घटनेनंतर सुवर्णसौधमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे.