बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रामतीर्थनगर येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्या अद्ययावत जिल्हा क्रीडांगणाच्या जागेची युवा सक्षमीकरण क्रीडा खाते आणि अनुसूचित जमाती कल्याण खात्याचे मंत्री बी. नागेंद्र यांनी नुकतीच पाहणी करून समाधान व्यक्त केले.
स्थानिक क्रीडापटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून विस्तीर्ण जमिनीमध्ये नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडांगण उभारण्याची मागणी अलीकडे जोर धरू लागली आहे आणि या मागणीची दखल घेत युवा सक्षमीकरण क्रीडा खाते आणि अनुसूचित जमाती कल्याण खात्याचे मंत्री बी. नागेंद्र यांनी शहरातील रामतीर्थनगर येथे नवे जिल्हा क्रीडांगण उभारण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे.
युवा सक्षमीकरण क्रीडा खाते आणि अनुसूचित जमाती कल्याण खात्याचे मंत्री बी. नागेंद्र यांनी नुकतीच नव्या जिल्हा क्रीडांगणासाठी निश्चित केलेल्या रामतीर्थ नगर हेस्कॉम ग्रीड नजीकच्या जमिनीची पाहणी केली. जिल्हा प्रशासन व संबंधित खात्याने निवडलेल्या या जमिनीबद्दल समाधान व्यक्त करताना मंत्र्यांनी जिल्हा क्रीडांगण उभारण्याचा आराखडा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार सर्व समावेशक असावा असे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे यासंदर्भात पावले उचलताना अधिकाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्र्यांची चर्चा करावी असेही त्यांनी सांगितले. राज्यात बेळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक संख्येने क्रीडापटू निर्माण होत असतात.
नव्या जिल्हा क्रिडांगणामुळे या उदयान्मुख क्रीडापटूंना फायदा होण्याबरोबरच त्यांना आपापल्या क्रीडा प्रकारात अधिकाधिक प्रगती करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असे मतही मंत्री बी. नागेंद्र यांनी व्यक्त केले.
नव्या अद्ययावत जिल्हा क्रीडांगणासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने बुडा यापूर्वीच 9 एकर 20 गुंठे जागा देऊ केली आहे. या जागेव्यतिरिक्त अतिरिक्त सहा एकर जागा पार्किंग व्यवस्थित साठी उपलब्ध केली जावी अशी सूचना जमिनीच्या पाहणी प्रसंगी मंत्री नागेंद्र यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. नव्या जिल्हा क्रीडांगणाच्या मागणीची पूर्तता करण्याद्वारे आम्ही फक्त जनतेची इच्छा पूर्ण करत नसून आमच्या भावी क्रीडा समुदायाच्या भविष्याची तरतूद करत आहोत, असे मतही मंत्र्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.