बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर आणि त्यांच्या कंपनीकडून भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यात केलेल्या 600 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची सरकारने दिलेल्या आदेशावरून निवृत्त बेळगाव जिल्हा न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली.
कारखान्याच्या संचालक मंडळाची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांनी पत्रकारांशी बोलताना कर्नाटक सरकारच्या आदेशावरून भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याच्या ठिकाणी आपण चौकशीसाठी आलो असल्याचे सांगितले. माजी आमदार निंबाळकर यांच्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येत आहे.
सदर चौकशीत कारखान्याचे संचालक मंडळ सहकार्य करत असून चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. चौकशी करून 31 दिवसात सरकारला अहवाल सादर करायचा आहे. आता पुन्हा 19 तारखेला साखर कारखान्याला भेट देऊन चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला जाईल, असे निवृत्त न्यायाधीश वस्त्रमठ यांनी सांगितले.
भाग्यलक्ष्मी साखर कारखाना चालवणारे खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर आणि कंपनीविरुद्ध मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम केलेल्या एस. बी. वस्त्रमठ यांना चौकशीचे विशेष अधिकार दिले आहेत.
खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीचा आदेश काढण्यात आला आहे. भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी शुगर प्रायव्हेट लिमिटेड शेतकऱ्यांचा पैसा आणि त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असल्याचे माजी आमदार निंबाळकर यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद केली आहे.
यासंदर्भात आमदार विठ्ठल हलगेकर यांची प्रतिक्रिया बेळगाव लाईव्ह कडे उपलब्ध होऊ शकली नाही.