बेळगाव लाईव्ह – भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी साखर आयुक्तांकडे केली होती.याची दखल घेऊन सरकारने निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी.वस्त्रमठ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार काल मंगळवारी न्यायाधीश एस.बी.वस्त्रमठ यांनी भाग्यलक्ष्मी कारखाना स्थळावर जाऊन चौकशी केली.
यावेळी भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे कार्य संचालक असिस्टंट रजिस्टर रवींद्र पाटील, महालक्ष्मी शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, प्रांताधिकारी कुमार, तहसीलदार प्रकाश गायकवाड यावेळी उपस्थित होते तसेच तक्रारदार माजी आमदार अंजली निंबाळकर याही यावेळी उपस्थित होत्या.
न्यायाधीश वस्त्रमठ यांनी सलग चार तास चौकशी करून सविस्तर पडताळणी केली. माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याबाबत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे आणि लैला शुगर कारखान्याच्या भाडेकरारात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल न्यायाधीशांना माहिती दिली. यावेळी न्यायाधीशानी चौकशी करून अहवाल शासनाकडे देणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान खानापूर येथील विश्रामधामात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी भाग्यलक्ष्मी आणि लैला साखर कारखाना भाडे करारातील त्रुटींचा दाखला देत कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले.तर,आमदार विठ्ठल हलगेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी आमदार अंजली निंबाळकर या सुरळीत चालू असलेला साखर कारखाना कसा बंद पडेल आणि येथील ऊस बाहेरील कारखान्यांना कसा जाईल हेच पाहत आहेत.
शेतकऱ्यांची ही जपण्यासाठी हा कारखाना चालवण्यासाठी महालक्ष्मी शुगर अँड ऍग्रो या कंपनी द्वारे घेतला आहे.अंजली निंबाळकर यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन आणि सरकार आपलेच असल्याने, खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून चौकशी लावली आहे सांगितले.