बेळगाव लाईव्ह :सरकारकडून थेट वेतन दिले जावे. होस्टेल व निवासी शाळा कंत्राटी नोकरांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत सेवा सुरक्षितता द्यावी आदी मागण्या कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि निवासी शाळा कंत्राटी नोकर संघाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केल्या असून त्यासाठी आंदोलन छेडले आहे.
सरकारने आपल्या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि निवासी शाळा कंत्राटी नोकर संघातर्फे आज गुरुवारी सुवर्ण विधानसौध येथील आंदोलन स्थळी धरणे सत्याग्रह करण्यात येत आहे.
सदर सत्याग्रहात बेळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यातील सरकारी हॉस्टेल आणि निवासी शाळा कंत्राटी नोकर संघाचे पदाधिकारी आणि कंत्राटी नोकर सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले जाणार आहे कंत्राटी पद्धत बंद करावी.
पगार थेट खात्यामार्फत दिला जावा. होस्टेल व निवासी शाळा कंत्राटी नोकरांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत सेवा सुरक्षितता द्यावी. समाज कल्याण खात्याने जारी केलेला कर्मचारी संख्या कमी करण्याचा आदेश रद्द करावा. मागासवर्गीय कल्याण खात्याच्या मॅट्रिक पूर्व आणि उत्तर बालकांच्या वस्तीगृहांमध्ये रात्रीच्या वेळी रखवालदाराची नेमणूक करावी. हॉस्टेल आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचा आहार भत्ता प्रतिदिन 100 रुपये यानुसार मासिक 3000 रुपये इतका वाढवावा.
गेल्या सुमारे 15 वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) व्यवस्थित जमा करण्यात आलेला नाही, तो तात्काळ जमा करण्याचा आदेश दिला जावा आदी विविध 18 मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना आउट सोर्स युनियनचे राज्याध्यक्ष भीमशेट्टी हमपल्ली म्हणाले की, सरकारी हॉस्टेल आणि निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना त्यांच्या एजन्सीजकडून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडून कामगारांना व्यवस्थित पगार दिला जात नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या मॅन पॉवर एजन्सीज असून त्या सरकारच्या आदेशानुसार किमान सरकारी वेतन देत नाहीत. आम्हाला नोकरीत सेवा सुरक्षितता दिली जावी. गेल्या 15-20 वर्षांपूर्वी आम्ही 500 -1000 रुपयात काम करत होतो. आता हा पगार किमान सरकारी वेतनानुसार 15-16 हजार रुपये झाला आहे. मात्र तितका पगार एजन्सीकडून दिला जात नाही. त्याचप्रमाणे पूर्वीपासून काम करत असलेल्यांना कामावरून कमी करणे दुसऱ्यांना घेणे असा खूप त्रास दिला जात आहे. आम्हाला नोकरीत सुरक्षितता दिली जावी तसेच आऊट सोर्स पद्धत बंद करून आम्हाला थेट सरकारकडून पगार मिळाला दिला जावा मग तो हजार रुपये कमी असला तरी चालेल, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
आजच्या आंदोलनासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आमच्या संघाचे पदाधिकारी आणि प्रमुख नोकरमंडळी सहभागी आहेत. महिन्याभरापूर्वी आम्ही 5 हजार लोकांनी आमच्या मागण्यांसाठी बेंगलोरमध्ये देखील आंदोलन केले होते. मात्र त्यावेळी फक्त आश्वासन देण्यात आल्यामुळे आम्ही आज बेळगावमध्ये आंदोलन करत आहोत अशी माहिती भीमशेट्टी हमपल्ली यांनी दिली.