बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या विविध भागात सध्या कचरा जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून निर्माण होणारा विषारी धूर कर्करोगाला आमंत्रण ठरत असल्याची माहिती मिळाली असून हा प्रकार लवकरात लवकर थांबण्याची गरज व्यक्त होत आहे.
कचऱ्यामध्ये वेगवेगळे घटक असतात ज्यामध्ये प्लास्टिक हा सर्वात प्रमुख घटक असतो. खाद्यपदार्थांची वेस्टने आणि इतर अनेक कारणासाठी वापरले जाणारे प्लास्टिक घटक कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात.
कचरा जाळल्या नंतर हे सारे घटक जळून त्यातून विषारी वायू हवेत मिसळण्याचा धोका सर्वात मोठा असतो दरम्यान सध्याच्या परिस्थितीत रस्त्याच्या कडे कडेने जाळला जाणारा कचरा हा या विषारी वायूची उत्पत्ती ठरत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरी आरोग्य संकटात सापडले आहे.
बेळगाव महानगरपालिकेची कचरा गोळा करण्याची यंत्रणा आहे. मात्र या यंत्रणेकडे देण्याऐवजी कचरा स्वतंत्रपणे जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज हजारो किलो कचरा बेळगाव शहर आणि परिसरात जाळला जात असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे.
हा प्रकार थांबण्यासाठी आता मनपाने योग्य ते पाऊल उचलण्याची गरज आहे. कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा कचरा दहन आरोग्यावर घाला ठरणार असून विषारी वायुपासून होणाऱ्या कर्करोगाला आमंत्रण ठरणार आहे.
मनपा आरोग्य विभाग, आरोग्य स्थायी समिती आणि स्वच्छता विभागाने याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.