बेळगाव लाईव्ह :कणबर्गी येथे नियोजित निवासी योजना क्रमांक ६१ च्या सर्व्हेसाठी गेलेल्या बुडाच्या (बेळगाव नगरविकास प्राधिकरण) अधिकाऱ्यांना काही शेतकऱ्यांनी विरोध केला.
यावेळी ज्या शेतकऱ्यांनी योजनेला मंजुरी दिली आहे, त्याठिकाणीच सर्व्हे करण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार केली.
गेल्या अनेक वर्षांपासून कणबर्गी योजना रखडली आहे. पुढील आठवड्यात नगरविकास मंत्री सुरेश भैरती बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान कणबर्गी योजनेला चालना देण्यात येणार आहे.
त्यामुळे आज बुडाचे अधिकारी कणबर्गी येथे योजनेच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या योजनेसाठी जमीन देण्यास नकार दिलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आपण योजनेसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या जागेचीच पाहणी करत
आहोत, असे सांगितले.
त्यामुळे शेतकऱ्यांनी तेथून माघार घेतली. यावेळी बुडाच्या कार्यकारी अभियंत्या मंजुश्री एम. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तात पाहणी करण्यात आली.