बेळगाव लाईव्ह:शासनाने राज्यातील महत्त्वाच्या प्रसिद्ध देवस्थान आणि पर्यटन स्थळांचा विकास पीपीपी पद्धतीनुसार करण्याची योजना आखली आहे. त्या अनुषंगाने सौंदत्ती रेणुका मंदिर परिसरातील विकास कामांबरोबर केबल कार प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन विकास मंत्री एच. के. पाटील यांनी विधानसभेत बोलताना दिली.
विधानसभेत आज मंगळवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या काळात मूडबिद्रीचे आमदार उमानाथ कोट्यान यांनी मांडलेल्या प्रश्नांला उत्तर देताना एच. के. पाटील बोलत होते. ते म्हणाले, शासनाने राज्यातील महत्त्वाच्या पुरातन प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळांची माहिती घेऊन एक विशेष योजना हाती घेतले आहे. धार्मिक, सांस्कृतिक, साहसी, कृषी,पारंपरिक अशा 26 प्रकारच्या पर्यटन प्रकल्पांकडे शासनाने विशेष लक्ष दिले आहे.
या योजनेअंतर्गत खाजगी ठेकेदारांना पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी पीपीपी पद्धतीवर काम देण्यात येणार आहे. राज्यातील उत्तर कर्नाटकातील सौंदत्ती येथील रेणुका देवस्थानाला वर्षभरात तब्बल 20 लाख भाविक भेट देत असल्यामुळे रेणुका डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाला चालना देण्याची मोठी संधी आहे. या ठिकाणी केबल कारचा प्रस्तावही मंजूर करण्यात आल्याची माहिती एच. के. पाटील यांनी सभागृहाला दिली.
दरम्यान, आज विधानसभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राजधानी बेंगलोर शहराच्या विकासासंदर्भात आखलेल्या ब्रँड बेंगळूर प्रकल्पासंदर्भात सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि विरोधी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रश्नोत्तराच्या काळात पक्षनेते आर. अशोक यांनी ब्रँड बेंगलोर योजना कागदावर राहिली आहे. या योजनेची कोणतीच कामे झालेली नाहीत. या योजनेसाठी अनुदान मिळालेले नाही असा दावा केला.
यावेळी मंत्री रामलिंग रेड्डी यांनी उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा हा महत्त्वाकांक्षा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी बेंगलोर शहरातील नागरिकांच्या सूचना घेण्यात आलेल्या आहेत. तज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विशेष कार्य समिती नेमण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्यातून ही योजना मार्गी लागणार आहे असे सांगून मागील सरकारने बेंगलोर शहरावर कोट्यावधींचे देणे बाकी ठेवले आहे असा आरोपही केला.
त्यावरून विरोधी पक्षातील भाजप आमदारांनी एकच गदारोळ सुरू केला. यावेळी काँग्रेस आमदार रायरेड्डी यांनी प्रश्नोत्तर काळाचे कामकाज योग्य पद्धतीने होत नसल्याची नाराजी व्यक्त करत सभात्याग केला.