बेळगाव लाईव्ह :राज्यसभेतील आपल्या विशेष उल्लेखात खासदार सदानंद शेठ तानवडे यांनी वास्को ते बेळगाव दरम्यान डेली अर्थात दैनंदिन पॅसेंजर रेल्वे सेवेची गरज स्पष्ट करताना नैऋत्य रेल्वेच्या माध्यमातून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
राज्यसभा सदस्य तानवडे यांनी वास्को ते बेळगाव डेली पॅसेंजर रेल्वेची आवश्यकता स्पष्ट करताना ही विश्वसनीय आणि कार्यक्षम रेल्वे सेवा त्वरित सुरू केली जावी अशी कळकळीची विनंती रेल्वे मंत्र्यांना केली.
गोवा आणि बेळगाव यांच्यातील आर्थिक संबंध स्पष्ट करताना खासदार तानवडे यांनी या प्रदेशातील लोकांना प्रवासासाठी तसेच येथील व्यापार आणि उद्योगाच्या सोयीसाठी नियमित आणि अखंड रेल्वे सेवा गरजेची असल्याचे सांगितले. उद्योग, व्यापार, शिक्षण वगैरे विविध उपक्रमांचे केंद्र असलेल्या बेळगावला गोव्याशी जोडणारा विश्वसनीय वाहतूक दुवा आवश्यक आहे. त्याची पूर्तता या रेल्वे सेवेमुळे होणार आहे.
बहुसंख्य गोवेकरी व्यवसाय, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय कारणास्तव तसेच खरेदीसाठी सातत्याने बेळगावला प्रवास करत असतात. त्यामुळे या मार्गाचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन या मार्गावर लोंढा व दूधसागर येथे थांबे असलेली दैनंदिन प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार केला जावा, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना केली.
खासदार तानवडे यांच्या म्हणण्यानुसार दैनंदिन रेल्वेसाठी लोंढा आणि दूधसागर येथे थांबे ठेवल्यास प्रवाशांची संख्या आणि संपर्क वाढेल. या खेरीज लोकप्रिय आकर्षण असलेल्या दूध सागरची पर्यटन क्षमता स्पष्ट करताना येथील थांब्याचे या नयनरम्य पर्यटन क्षेत्रात चांगले योगदान लाभेल.
एकंदर लोंढा आणि दूध सागर येथे थांबे असलेली वास्को ते बेळगाव दैनंदिन रेल्वे सेवेचे जोरदार समर्थन करताना या रेल्वे सेवेमुळे स्थानिकांची तातडीच्या प्रवासाची गरज भागण्याबरोबरच व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळणार असून जे गोवा आणि बेळगाव या दोन्ही प्रदेशांसाठी फायद्याचे आणि एकूणच कल्याणकारक ठरणार आहे, असे खासदार सदानंद शेठ तानवडे यांनी शेवटी स्पष्ट केले.