बेळगाव लाईव्ह :जिल्ह्यात 100 टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असल्यामुळे यावेळी फारशी समस्या उद्भवणार नाही. तथापि कोरोनाच्या नव्या संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाने सर्व ती सिद्धता केली असल्याने चिंतेचे कारण नाही. त्याचप्रमाणे नव्या संसर्गासंदर्भात आज सायंकाळपर्यंत सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
राज्यात पुन्हा नव्याने उद्भवलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज गुरुवारी पार पडलेल्या पूर्व खबरदारीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी पार पडलेल्या बैठकीत कोरोनाच्या नव्या संसर्गाला आळा घालण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोणे आणि बिम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक व प्रमुख डॉक्टर्स उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, पुन्हा उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही सर्व ती तयारी, सिद्धता केली आहे. बीम्स हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनसह 908 बेड्स सध्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 78 व्हेंटिलेटर्स देखील सिध्द आहेत. आवश्यकता भासल्यास ज्यादा ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची सोय केली जाईल. सर्वांनी कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसरी लाट अनुभवली आहे. त्यामुळे सर्वांना पुरेसा अनुभव असल्यामुळे मागील वेळी ज्या चुका झाल्या आहेत त्यांची पुनरावृत्ती होता कामा नये असे निर्देश आम्ही वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स वगैरे संबंधित सर्वांना दिले आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाटकच्या आणि जिल्ह्याच्या महाराष्ट्र सीमेवरील तपासणी संदर्भात बोलताना याबाबत सरकारच्या पातळीवर बैठक घेण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने जर सीमेवरील तपासणी संदर्भात आदेश दिल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल. बहुदा त्या अनुषंगाने आज आम्हाला नवे निर्देश मिळतील असे सांगून जिल्ह्यात 100 टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. त्यामुळे यावेळी फारशी समस्या उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे आज सायंकाळपर्यंत सरकारकडून एकत्रित नवी मार्गदर्शक सूची जारी केली जाईल. राज्य सरकारकडून जी मार्गदर्शक सूची येईल तिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.
आमदार असिफ सेठ यांनी यावेळी बोलताना मागील वेळी अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पूर्वतयारीची बैठक घेता आली नव्हती. मात्र यावेळी आज आम्ही ती बैठक घेतली. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि वार्ड राखीव ठेवण्याबरोबरच आवश्यक औषधोपचाराची सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर्स सर्व कांही सुसज्ज करण्यात आले असल्यामुळे चिंतेचे कारण नाही. यावेळी आपल्याला पूर्व तयारीसाठी वेळ मिळाला आहे. शिवाय कोरोनाचा नवा व्हेरिएंट तितकासा धोकादायक नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून चांचणी यंत्रणा उद्यापासून कार्यान्वित होईल, असे आमदार शेठ यांनी सांगितले.