बेळगाव लाईव्ह :सहकारी सोसायटी, क्रेडिट सोसायटी, मल्टीस्टेट आदींच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सहकारी चळवळीत ठेवीदार पैसे भरून भिकारी होऊ लागले आहेत. ठेवी मागण्यास जाणाऱ्या ठेवीदारांना वाढीव टक्के देतो, रिनिवल करूया असे सांगून परत पाठविले जात आहे. संबंधित संचालकांनी लाज लज्जा सोडून बकासुर होण्यातच सुख मानले आहे. कर्जे देताना तोंडी लोणचे लावण्याची घातक प्रवृत्ती वाढत आहे. याबद्दल आता खुलेआम चर्चा सुरू आहे. बेळगाव लाईव्ह ने यावर प्रकाशझोत टाकला असता लोणचं चर्चेत आलं मात्र ते खाणारे अजूनही आपण साव असल्याचा आव आणत आहेत.
ठेवीदार अडचणीत येण्यास संचालकांनी खाल्लेलं ‘लोण’चं जबाबदार ठरू लागलं आहे. प्रकाराची बेळगाव आणि परिसरात जोरदार चर्चा आहे. बेळगाव लाईव्ह ने प्रकाशझोत टाकून जागरूक केल्याबद्दल अनेकांनी आभार मानले आहेत. शिवाय संबंधित मल्टिस्टेटचे आणि संलग्न संस्थांचे अनेक गैरव्यवहार उघडकीस येऊ लागले आहेत. लोणचं खाण्याचा प्रकार किती गंभीर आहे आणि त्यातून एका संस्थेची अवस्था कुठवर गेली आहे याची कल्पना करणेच सद्या व्यर्थ ठरत आहे.
पोलीस स्थानकात मदत मागायला गेल्यास जसे काय’द्याचं’ बोला अशी म्हण प्रचलित असल्याचे सांगितले जाते, तसेच संबंधित संस्थेत कर्ज मागायला गेल्यास लोन पाहिजे असेल ‘लोण’चं काय देणार? अशा प्रचलित म्हणीची चर्चा सुरु झाली आहे. लोन चं काम पुढे सरकायचं असेल तर लोणचं द्यावं लागतं. याची माहिती असलेले कर्जदार फॉर्म बरोबर लोणचेही घेऊन जातात.
विशेष म्हणजे त्यासाठी बाहेरून अधिक व्याजाने पैसे काढले जातात. लोणचं पोचलं की कर्ज प्रोसेस लवकरात लवकर केली जाते. एकदा कर्ज मिळालं की गोड बोलणारा कर्जदार शिव्या द्यायला लागतो. आणि तोंडाला लोणच्याची वास येत असल्यामुळे कर्जासाठी पाठपुरावा केलेले संचालक जास्त आवाज चढवू शकत नाहीत. काय करणार ते करा असे म्हणत कर्जदार मोकळा होतो आणि ठेवीदारांच्या पैशांवर टाच येते. ही भयानक परिस्थिती संस्थेच्या भवितव्यावर प्रहार करत आहे. लोणचं खाणारे काही दगावले तर बहुतेक हात वर करून मोकळे झाले आहेत. यामुळे आता संबंधित कर्जे भरून घेणार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे.
प्रत्येक कर्जदाराला समान नियम आणि अटी लावून योग्यपद्धतीने कर्जे वितरित केल्यास संचालकांना लोणचं मिळत नाही. लोणचं खाल्लं की कर्जदार लोन फेडण्याचं पुढे बोलतच नाही. आणि गब्बर झालेले संचालक पुढे आळी पाळीने एका संस्थेवरून दुसऱ्या संस्थेवर सापशिडी खेळत राहतात. असे वातावरण सहकार क्षेत्राच्या एकंदर प्रगतीला बाधक ठरत आहे.
सहकार महर्षी म्हणवून घेणारे सहकार संपविण्याचे महर्षी ठरू लागले आहेत. ठेवीदारांच्या जीवावर लफंग्यांची चैनी सुरु झाली आहे. यामुळे ठेवीदार धोक्यात आला आहे. संस्थेची पत वाढविण्यापेक्षा स्वतःची पत वाढवण्यात व्यग्र मंडळींनी हा कारभार सुरू केला आणि संस्थेला डबघाईला नेण्याचे काम सुरू झाले आहे.
नव्या वर्षात या प्रकारावर योग्य आवाज उठविला जाणार आहे. संबंधित बुडीत कर्ज आणि ते मंजूर करताना ज्यांनी सह्या केल्या ते लोणचे खाऊ संचालक यांना आता चौकशीला सामोरे जावे लागेल. सहकार खात्याच्या चौकशी सत्राने संबंधितांची पळता भुई थोडी होणार आहे. समाजातील विविध स्थरातील मान्यवरांच्या भेटी घेऊन आमच्या मागे लागलेले हे संकट आवरा अशी मागणी केली जात आहे. मात्र सध्यातरी कोणीच भ्रष्ट कारभाराला साथ देण्यास पुढे येईनासा झाला आहे. ठेवीदार जागृत झाला तर वेळीच उरली सुरली रक्कम तरी हाती लागेल अन्यथा सारा माल लोणचं खाणाऱ्यांच्या तोंडात घालून त्यांनी दिलेल्या कर्जाच्या परताव्याची वाट बघत बसावे लागणार आहे.
चूक झाली आहे पुन्हा करणार नाही असे सांगून हात वर करण्याचा आणि समोर वाढून ठेवलेल्या कारवाईला दुर्लक्षित करण्याचा प्रकार महागात पडणार हे नक्की आहे. याबाबतीत बेळगाव लाईव्ह ची भूमिका ठेवीदारांना डोळस करण्याचं आहे. काळी कृत्ये करणाऱ्यांच्यावर पांघरून घालण्याचं आमचं काम नाही आणि निशाण्यावर बाण मारण्याचं कामही माध्येमे करू शकत नाहीत. कृष्णकृत्य करणाऱ्यांचे चेहरे काळवंडू लागले आहेत. आता निशाणा ओळखून बाण मारण्याचे काम ठेवीदार रुपी अर्जुनांनाच करावे लागणार आहे …… (क्र. म. श. )