बेळगाव लाईव्ह :सहकारातील स्वाहाकाराबद्दलची चर्चा सुरू झाल्यानंतर चुका दुरुस्त करण्याची ग्वाही दिलेल्या मात्र तशाच चुका आणखी सुरू ठेवलेल्या त्या मल्टीस्टेट चे ठेवीदार अद्याप अडचणीत आणि ढोक्यातच आहेत.
सहकारी संस्था सामान्य नागरिकांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी काढल्या जाव्यात आणि त्या टिकल्या तर सामाजिक स्थर उंचावण्यास मदत होते. मात्र अशा संस्था सुरू करून सभासद आणि ठेवीदारांचे हीत जोपासण्यासाठी कटिबध्द न राहता आपलीच भर करून घेण्याचा प्रकार राजरोस सुरू असल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. सहकार चळवळीच्या नावाखाली केले गेलेले अनेक धंदे उघड झाले आहेत.
बेळगाव येथून सुरू होऊन इतर राज्यात व्यवहार वाढविलेली एक संस्थाही अशीच प्रचंड मोठ्या गैर व्यवहारात अडकली असून ठेवीदार धोक्यात आले आहेत. ठेवीदारांच्या माध्यमातून रक्कम जमवून ती नको त्या कारणासाठी खर्ची पाडण्यात आल्याने सर्वकाही ठण ठणात होण्यास आता वेळ लागणार नाही हे स्पष्ट बनले आहे.
कोट्यवधीची कर्जे कमिशनच्या आशेने देऊन या संस्थेने आपला बेजबाबदारपणा सिद्ध केला आहे. बेळगाव तालुक्यातील एका व्यक्तीला दिलेल्या त्या मोठ्या कर्जाची, थांबलेल्या वसुलीची आणि डोळे झाकून कर्ज वितरण करताना खाल्लेल्या कमिशन ची चर्चा जोरात सुरू असताना आता अशीच कमिशनच्या आशेने डोळे झाकून दिलेली अनेक कर्जे ठेवीदारांना त्रासाची ठरणार असल्याचे उघड होत आहे. बैठकीत मंजूर केलेले तीन आणि त्यानंतर झालेले तेरा. खात्यातून गेलेले तीन आणि कॅश केलेले तेरा यातून संस्थेचा तीन तेरा करण्याचा प्रकार झाला आहे. हे एकच उदाहरण सार्वजनिक पातळीवर चर्चेत असले तरी अश्या अनेक उदाहरणांचा नुसता आढावा घेतला तरी संस्थेने अनेकांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशांची बेमालूम उधळपट्टी केली असल्याचेच दिसून येत आहे.
सुरुवातीला भागधारक आणि ठेवीदारांच्या जीवावर संस्था उभी करायची. त्यांच्या जोरावर संचालकांच्या अंगावर मांस चढवून घ्यायचे. पूर्वी इतरांना हात करून प्रवास करणारे चारचाकी गाड्या घेतात. मात्र हे सर्व कर्ज देण्यासाठी खाल्लेल्या कमिशनच्याच जोरावर होत आहे. हे उघड झाले. कर्जदार कमिशन देऊन मोकळा होतो आणि नंतर कर्ज भरण्यास हात वर करतो.. दरम्यान ही कर्जाची रक्कमच परत न आल्यास ठेवीदारांनी दिलेली रक्कम देणार कशी? असा प्रश्न निर्माण होतो. सध्या ती मल्टीस्टेट अशाच अडचणीच्या भोवऱ्यात आली असून काही काळ गेल्यास कर्जे वाऱ्यावर, कमिशन खाऊ संचालक गायब आणि ठेवीदार कपाळावर हात मारून घेणार की काय असे वातावरण तयार झाले आहे.
संस्थेच्या एकंदर इतिहासात अशी अनेक कर्जे काळाच्या ओघात हरवून गेली असल्याची माहिती उघड होत आहे. संस्थेच्या एका ज्येष्ठ व्यक्तीने तर आपल्या हयातीत इतरांची कर्जे स्वतः भरण्याची हमी घेऊन अनेक मोक्याच्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या आहेत. त्या जमिनींवर बोजा चढला आणि कर्जेही फुगत गेली, मात्र ती भरलीच गेली नाहीत. याप्रकारे आणखी काही संचालकांनी संस्थेला गोत्यात आणले आहे. एका वाहन विक्रेत्याशी केलेली पार्टनरशिप असो किंवा एक वर्षात पैसे डबल करणाऱ्या भुरट्या योजनेतील गुंतवणूक असो संचालकांनी आणि त्या त्या काळातील प्रमुखांनी आपली पोळी भाजून घेताना संस्थेचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान केले आहे. अशी माहिती हाती आली आहे. या साऱ्या गोष्टी ठेवीदारांच्या जीवावर झाल्या असून ठेवीदारांना पैसा कुठून देणार हा प्रश्न गंभीर बनला आहे.
एकंदर बाबतीत संस्थेचे उद्दिष्ठ आणि उद्देश याला तिलांजली देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी आणि फुगलेल्या कर्जांच्या परतफेडीसाठी कधी प्रयत्नच झाले नाहीत. तसे केले तर खाल्लेली कमिशने बाहेर पडतात हे खरे दुखणे होऊन बसले आहे. संस्था चालविण्याची जबाबदारी घेतलेल्या अनेकांचे हात दगडाखाली अडकले आहेत. बनावट सेल डीड झालेल्या जमिनीवर करोडो रुपयांचे कर्ज देऊन सेल डीड रद्द झाल्यानंतर कर्ज परत न घेताच बोजा उतरवावा लागला आहे. अशी अनेक प्रकरणे संस्थेला घातक ठरणार आहेत.
२०२३ ला निरोप देतानाच नव्या वर्षात अशा भ्रष्ट संचालकांना कारवाईच्या कचाट्यात अडकवणे आणि ठेवीदारांना सावध करणे हेच ब्रीद असणार आहे. संबंधित संस्थेची योग्य चौकशी होणे सध्या काळाची गरज बनली आहे. नुकत्याच झालेल्या एका संस्थेच्या मालमत्ता जप्तीच्या प्रक्रियेनंतर हा मुद्दा जोरात चर्चेला आला आहे. सहकार चालवून आपले वजन वाढवून घेताना आपल्यावर विश्वास ठेऊन ठेवी भरणाऱ्या माणसांच्या प्रत्येक रुपयाची काळजी घेणे हे सुध्दा कर्तव्य आहे. ज्यांची वाड वडिलार्जित जमीन नाही, तुटपुंज्या पगारावर जगत असल्याचे जे दाखवतात त्यांनी मीटिंग भत्ता घेऊन करोडोचे बंगले कसे बांधले? ठेवीदारांच्या ठेवी कर्ज रुपात वाटताना कमिशन खाऊन माया कशी जमविली? याचा तपास सुरू होणार आहे. नवीन वर्षात हे होणे महत्त्वाचे ठरणार असून अशा व्यक्तींना चाप बसणार आहे. सद्या ठेवीदारांचे हीत जोपासण्यासाठी अनेकजण पुढे आले असून त्यामुळे भ्रष्ट मंडळींना धक्के बसणार आहेत.
क्रमशः