बेळगाव लाईव्ह :रस्त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने बेळगाव महापालिकेच्या मुख्य कार्यालयाजवळील रस्ता आता प्लास्टिक पावडर मिश्रित डांबराने तयार केला जाणार आहे. यासाठी 6 लाख रुपये खर्च येणार असून नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या माहितीनुसार प्रायोगिक तत्त्वावर महापालिके जवळील रस्ता प्लास्टिक मिश्रित डांबरापासून तयार केला जाणार आहे. प्लास्टिकचा वापर करून रस्ते केल्यास डांबराचा वापर 10 टक्क्याने कमी होण्याद्वारे खर्चात बचत होते.
याव्यतिरिक्त रस्ते बांधकामासाठी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे शहरातील प्लास्टिक कचऱ्याची समस्या देखील निकालात निघण्यास मदत होणार आहे. एकंदर महापालिकेजवळील संबंधित रस्त्याच्या स्वरूपात शहरात पहिल्यांदाच प्लास्टिक मिश्रित डांबरी रस्ता होणार आहे रस्त्याचा हा प्रकल्प सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असून रस्ता बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
आता सदर प्रकल्पाला मंजुरी मिळताच लवकरच बेळगावातील पहिला प्लास्टिकचा रस्ता तयार केला जाणार आहे.
वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की प्लास्टिक पावडर अंतर्भूत असलेले डांबरी रस्ते हे फक्त दीर्घकाळ टिकाऊच नसतात तर पर्यावरण पूरक देखील असतात. त्यामुळे प्लास्टिक मिश्रित डांबरी रस्ते बनविण्याचे हे पाऊल म्हणजे शहरात टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल आहे असे म्हणावे लागेल.
प्लास्टिक मिश्रित डांबरी रस्त्याच्या निर्मितीसाठी महापालिकेने यापूर्वीच शहरातील दुकान आणि विविध ठिकाणाहून बंदी घातलेले प्लास्टिक जप्त करण्याच्या कारवाईद्वारे सुमारे 5 टन प्लास्टिकचा साठा जमा केला आहे.
याबरोबरच पृथक्करण केलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा रस्ते बांधकामासाठी पुनर्वापर केला जाणार आहे. यापूर्वी शहरातील प्लास्टिक कचरा सिमेंट फॅक्टरींना देण्यात येत होता. मात्र आता तो कचरा रस्ते बांधकामासाठी वापरला जाणार आहे.