बेळगाव लाईव्ह :महापौरांसाठी असलेल्या आपत्कालीन निधीचा गैरवापर करण्यात आला असल्याचा आरोप नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी केला असून त्यावर महापौराणि खुलासा द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार वादावादी होऊन महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत जवळपास दीड -दोन तास गोंधळ उडाल्याची घटना आज घडली.
बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक आज बुधवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत महापौरांच्या आपत्कालीन निधीचा मुद्दा गाजला. बेळगाव महापालिकेच्या महापौरांसाठी 1 कोटी रुपये आणि उपमहापौरांना 50 लाख रुपये इतका आपत्कालीन निधी राखीव ठेवला जातो. माजी महापौर दिवंगत संभाजी पाटील यांच्या कारकिर्दीत सदर निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
शहरात अचानक एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार त्यानंतर या निधीचा विनियोग केला जात होता. मात्र विद्यमान महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी समुदाय भवन कमान उभारणीसाठी या निधीचा वापर केला असल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक मुजम्मिल डोणी, नगरसेवक अजीम पटवेगार आदींनी केला.
तसेच महापौरांना त्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावरून सत्ताधारी गट आणि विरोधी गटामध्ये शाब्दिक खडाजंगी उडून जवळपास दीड -दोन तास सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी खर्च केलेल्या निधी संदर्भात महापौरांनी प्रारंभी स्पष्टीकरण दिले नाही. तथापी मनपा अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात खुलासा करताना संबंधित निधी आपत्कालीन कारणासाठी असला तरी तो कोठे? किती? खर्च करायचा याचे अधिकार महापौरांना असल्याचे सांगितले.
तेंव्हा महापौर सोमनाचे यांनी अधिकाऱ्यांची रि ओढत आपल्याला अधिकार असल्यामुळे आपण तो निधी खर्च केला असल्याचे स्पष्ट केले. त्यावर आपत्कालीन कारणासाठी राखीव असलेला निधी आपण कमानीसाठी कसा वापरू शकता? असा जाब विरोधी गटाच्या नगरसेवकांनी विचारला. यावरून सभागृहात वादावादीला सुरुवात झाली.