बेळगाव लाईव्ह:गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव शहर परिसरात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वाधिक 29 अंश (सेल्सिअस) इतके तापमान असणाऱ्या बेळगाव शहराचा पारा आज गुरुवारी 15.4 अंशावर येऊन ठेपला आहे.
मागील कांही दिवसांपूर्वी वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली होती. आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीने जोर धरला आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा वाढण्याबरोबरच रात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे घरामध्ये असलेले ठेवणीतील गरम कपडे बाहेर पडू लागले आहेत.
थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण गरम कपडे खरेदी करण्याकडे वळले आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. थंडीमुळे शहराच्या उपनगरांसह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
हवामानात वारंवार होणारा बदल आणि आता पडू लागलेली थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ऑक्टोबरचे उष्ण तापमान ओसरल्यानंतर एकदम थंडीला सुरुवात झाल्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.