बेळगाव लाईव्ह:यंदा पावसाळा तर उशिरा सुरू झालाच शिवाय अवकाळी पाऊस देखील म्हणावा तसा झाला नसला तरी यावेळी राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दीड फूट जास्त आहे. मार्कंडेय नदीतील पाण्याचा उपसा वाढविल्याने हे घडले असून त्यामुळे आता राकसकोप जलाशयातील पाण्याच्या बाबतीत येत्या जून महिन्यापर्यंत चिंता नसल्याचे कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाने स्पष्ट केले आहे.
बेळगाव शहरासाठी सध्या मार्कंडेय नदीतून दररोज 30 एमएलडी इतका, तर राकसकोप जलाशयातून दररोज 22 एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे सध्या शहराला तीन ऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. राकसकोप जलाशया ऐवजी मार्कंडेय नदीतील पाण्याचा उपसा वाढविण्यात आला असला तरी तो डिसेंबर अखेरपर्यंत करता येणार आहे. एकंदर नदीतील पाणी उपशामुळे राकसकोप जलाशयातील पाण्याची बचत होऊन त्याचा लाभ बेळगावकरांना मिळत आहे.
यावर्षी राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे जलाशय भरण्यास विलंब लागला होता. त्यामुळे जून, जुलै ऐवजी ऑगस्टमध्ये जलाशय तुडुंब झाले होते. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली दरवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोच, शिवाय अवकाळी पावसामुळे जलाशयातील पाण्याची पातळी स्थिर राहते.
तथापि यावर्षी अवकाळी पाऊस देखील म्हणावा तसा झाला नसल्यामुळे राकसकोप मधील पाण्याची पातळी घटणार हे लक्षात घेऊन पायाभूत सुविधा मंडळ व एल अँड टी कंपनीने मार्कंडेय नदीतील पाणी उपसा या वेळी दर वर्षीपेक्षा वाढविला. परिणामी आता येत्या जून महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राकसकोप जलाशयात उपलब्ध आहे.
राकसकोप जलाशयातील पाण्याच्या पातळीची नोंद दररोज ठेवली जाते गतवर्षी कालच्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबर रोजी 2471.02 फूट इतकी असणारी पाण्याची पातळी यंदा 2472.85 फूट इतकी. आहे.
हा पाणीसाठा लक्षात घेता येत्या जूनपर्यंत शहराला पाण्याची चिंता नसल्याचे कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की येत्या उन्हाळ्यात बेळगाव शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.