बेळगाव लाईव्ह : ख्रिश्चन बांधवांचा नाताळ ( ख्रिसमस) सोमवारी साजरा होणार आहे. येशू जन्म सोहळ्यानिमित्त रविवारी मध्यरात्री जन्मोत्सव साजरा झाला. ख्रिसमसनिमित्त सर्वच प्रार्थनास्थळांवर आणि निवासस्थानांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
येशू ख्रिस्तांच्या जन्माचे देखावे ठिकठिकाणी तयार केले आहेत. कॅम्प येथील प्रमुख प्रार्थनास्थळात सोमवारी दुपारी बिशप डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या उपस्थितीत प्रार्थना होणार आहे. यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला जाणार आहे.
नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी आपापल्या अंगणात ख्रिसमस ट्री लावून त्याला देखणे रुप दिले आहे. चर्च, घरांना रोषणाई केली असून नातलग व मित्रमंडळीना फराळ व शुभेच्छा देऊन नाताळचा आनंद साजरा होणार आहे.
कॅम्प येथील फतिमा कॅथेड्रल चर्च, सेंट अँथनी चर्च, इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च (आयसी चर्च), डिव्हाईन मर्सी चर्च, बेळगाव चर्च, सेंट्रल मेथडीस्ट चर्च, माउंट कार्मेल चर्च, सेंट सेबेस्टियन चर्च याठिकाणी येशू जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नाताळच्या पूर्वसंध्येला रविवारी भेटवस्तू खरेदीसाठी शहरातील मॉल, गिफ्ट शॉप, दुकानांत लगबग होती. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली तसेच शहापूर, टिळकवाडी, अनगोळ भागातही विविध साहित्य खरेदीला प्रतिसाद मिळाला. रविवारी सायंकाळपासूनच सोशल मीडियावर नाताळनिमित्त शुभेच्छांची देवाणघेवाण सुरु होती.