बेळगाव लाईव्ह :के.एच.बी. बडावने बसवन कुडची येथून राष्ट्रीय महामार्ग 46 पर्यंत असणाऱ्या संपर्क रस्त्यावरील पूल तात्काळ बांधण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक गृह मंडळी बडावने रहिवासी संघ, बसवन कुडची यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
कर्नाटक गृह मंडळी बडावने रहिवासी संघ, बसवन कुडचीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज मंगळवारी सुवर्ण विधानसौध आंदोलन स्थळी निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना बसवन कुडचीचे शिवानंद धारप्पणावर म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गापासून बसवन कुडची, देवराज अर्स कॉलनी, के.एच.बी. कॉलनीपर्यंत जो रस्ता आहे तो जवळपास 8 ते 10 कि.मी. अंतराचा आहे.
याउलट मधे आणखी एक संपर्क रस्ता आहे जो थेट महामार्गाला जाऊन मिळतो. या रस्त्यावरून बसवन कुडची भागातील लोकांसाठी राष्ट्रीय महामार्ग अवघा 3 कि.मी. अंतरावर पडतो. मात्र या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम प्रलंबित आहे. पुलाच्या दोन्ही अंगाचा रस्ता तयार झालेला आहे. सदर पूल बांधून दिल्यास आमच्या भागातील लोकांची अत्यंत चांगली सोय होणार असून 7-8 कि.मी. प्रवासाचे अंतर वाचण्याबरोबरच वेळेचीही बचत होणार आहे.
सदर पूल बांधण्यात यावा यासाठी आम्ही यापूर्वी बऱ्याचदा आंदोलना केली आहेत. सरकार दरबारी अर्ज विनंती केल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. फिरोज सेठ बेळगावचे आमदार असल्यापासून ते आज राजू सेठ आमदार आहेत, या उभयतांना देखील आम्ही निवेदन दिली आहेत. मात्र आश्वासन देण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
मागील जनसंपर्क कार्यक्रमांमध्ये देखील आम्ही पुलाच्या बांधकामासंदर्भात निवेदन दिले आहे. एकंदर सदर पुलाचे बांधकाम होणे आमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, असे शिवानंद धारप्पणावर यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. एस. आर. बजंत्री, एन. बी. मोरबद, पी. जी. पाटील, डी. बी. कलारकोप्प, मल्लिकार्जुन व्ही. के., मंजू उज्जनकोप्प, बाहुबली के. आदी यांच्यासह अन्य उपस्थित होते.