बेळगाव लाईव्ह :देशातील एकमेव असा दावा करत बेळगाव महापालिकेने मोठा गाजावाजा करून उभारलेला टाकाऊ फुले व निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्याचा प्रकल्प प्राथमिक अवस्थेतच बंद झाला आहे. तथापी कहर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत बंदावस्थेतील या प्रकल्पावर आधारित स्टॉलला पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यामुळे बेळगाव महापालिकेकडून डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
फलोत्पादन खात्याने अशोकनगर येथे उभारलेल्या होलसेल फुल मार्केट आवारात तीन महिन्यापूर्वी बेळगाव महापालिकेने टाकाऊ फुले व निर्माण यापासून अगरबत्ती बनवण्याचा प्रकल्प उभारला आहे. जिल्हाधिकारी आमदार, महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. फुल मार्केटसह शहरातील सर्व मंदिरातील निर्माल्य आणि टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती बनवण्याचा हा प्रकल्प होता.
पहिल्याच महिन्यात त्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली. त्याचप्रमाणे बेंगलोर येथे अलीकडे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत बेळगावच्या या प्रकल्पावर आधारित स्टॉल उभारण्याचा मान महापालिकेला मिळाला होता. सदर स्टॉलला पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले होते. तथापि प्रत्यक्षात सदर प्रकल्प प्राथमिक अवस्थेतच बंद आहे. त्यामुळे महापालिकेने नेमकी कुणाच्या डोळ्यात धूळफेक केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या होलसेल फुल मार्केट आवारात मोठ्या प्रमाणात टाकाऊ फुलांचा साठा पडलेला असताना अगरबत्ती प्रकल्पाला मात्र टाळे ठोकण्यात आले आहे. सदर प्रकल्पाला साधी वीज जोडणी देखील करण्यात आली नसल्यामुळे मुळात हा प्रकल्प कधी सुरू झालाच नाही, असे फुल मार्केटमधील व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या आंधळ्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी प्रकट केली जात आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने हा प्रकल्प सुरू केला असला तरी तो बंद पडण्याचे नेमके कारण काय? असा सवाल केला जात आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पाला सुरू करताना शहरातील विविध मंदिरातून निर्माण जमा करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात एकाही मंदिरातून निर्माण जमा करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
होलसेल फुल मार्केटमधील या प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर तो एक दिवसही सुरू झाला नाही. त्या ठिकाणी कोणतेही उत्पादन घेण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे. महापालिकेने केवळ नावाला शेड उभारले आहे. त्या ठिकाणी उत्पादनच घ्यायचे नव्हते तर एवढा गवगवा का केला गेला? असा सवालही केला जात आहे.
दरम्यान महापालिकेचे पर्यावरण अधिकारी हणमंत कलादगी यांनी प्रकल्प बंद असल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. स्व -सहाय्य संघाकडून अगरबत्ती बनवून घेण्याचे काम सुरू आहे. रोज सकाळी हे काम सुरू असते असे त्यांनी सांगितले. मात्र परिसरातील लोकांनी एकही दिवस प्रकल्प सुरू झाला नसल्याचा आरोप केला आहे.