बेळगाव लाईव्ह:कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन यावर्षी ४ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. यामुळे बेळगावात राजकीय जत्रा भरणार आहे. सभापती यु टी खादर यांनी याचे संकेत दिले आहेत.
यावेळचे अधिवेशन १२ दिवसांचे असेल आणि यामध्ये प्रामुख्याने उत्तर कर्नाटकाच्या विकासावर भर दिला जाणार आहे. अधिवेशनाची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. अशी माहिती मिळाली.
विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी तर यावेळचे अधिवेशन १५ दिवसांचे व्हावे अशी मागणी केली आहे. उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर ४०० कोटी रुपये खर्च करून उभारलेले सुवर्ण विधान सौध भूतबंगला होऊ नये याची काळजी आपणच घ्यायला हवी. अशी त्यांनी टीका केल्यामुळे राज्यभरात याची चर्चा झाली.
बेळगावात होणारे अधिवेशन हा मराठी भाषिकांच्या दृष्टीने संतापाचा विषय ठरला आहे. दरवर्षी राजकीय जत्रा भरवून विकासाच्या वल्गना केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात विकास होत नाही. करोडो रुपयांच्या निधीचा चुराडा होतो. याला आता कन्नड भाषिकही कंटाळले आहेत. यामुळेच दिवंगत नेते उमेश कत्ती यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी केली होती. दरम्यान या मागणीला विरोध झाला असला तरी पुन्हा एकदा तशाच पद्धतीची मानसिकता कन्नड भाषिकांत वाढताना दिसत आहे.
कर्नाटक सरकारचे अधिवेशन यावेळी कोणत्या विषयावर रंगणार हे पाहावे लागणार आहे. प्रचंड मोठा पाडाव झाल्यामुळे बॅक फुटवर गेलेला भाजप, विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आलेले अपयश आणि गॅरंटी योजना अंमलात आणून पुढे आलेला काँग्रेस या वातावरणात होणारे अधिवेशन नेमक्या कोणत्या चर्चा करणार आणि विकासाच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधकांची भूमिका काय असणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.