बेळगाव लाईव्ह :पत्नीनेच आपल्या व्यसनाधीन पतीचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना चिक्कमुन्नोळी (ता. खानापूर) येथे नुकतीच घडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
खून झालेल्या इसमाचे नाव बाबू कल्लाप्पा कर्की (वय 48) असे असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या त्याच्या पत्नीचे नांव महादेवी बाबू कर्की असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबू कर्की याला दारूचे व्यसन होते. दारूसाठी सतत पैशाची मागणी करत तो पत्नी व मुलांना मारहाण करत होता. व्यसनाधीन बाबूने आपली शेतीही गहाण ठेवून सावकारी कर्ज काढले होते. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या महादेवी हिने गेल्या सोमवारी बाबुला रात्री जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यानंतर तिने गाढ झोपलेल्या बेसावध बाबूचा दोरीने गळा आवळून खून केला. अति मद्यपान केल्याने पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करत दुसऱ्या दिवशी सकाळी तिने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी बाबुला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबतची माहिती मिळताच चिक्कमुन्नोळी येथे दाखल झालेल्या नंदगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. बाबू कर्की याच्या गळ्यावर दोरीचे वळ उमटले असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान पोलीस चौकशीत पत्नी महादेवी हिने खुनाची कबुली दिली. तेंव्हा पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील अधिक तपास करत आहेत.