बेळगाव लाईव्ह:शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे सध्या बेळगावच्या नागरिकांना एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. भव्य मॉल उभारण्यात आला आहे, मात्र ग्राहकांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने नेहमीची कोंडी आणि नागरिकांचे हाल असे चित्र आहे.
पार्किंगची सोय केलेली नसताना या मॉल ला परवानगी दिली कशी आणि कुणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या नागरिक या त्रासाला कंटाळले आहेत. व्यापार करताना इतरांना त्रास होऊ देऊ नये इतके भानही संबंधित मॉल मालकांना नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
बेळगाव महानगरपालिका आणि पोलीस मदत करणार का? असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत. शुक्रवार पेठ टिळकवाडी, इस्कॉन टेंपल रोडवरून डिव्हाईन प्रोव्हिडन्स स्कूलकडे जाताना मिलेनियम गार्डन समोर आणि त्याच्या पुढे एक मॉल/कॉम्प्लेक्स आहे.
ग्राहकांची सर्व वाहने रस्त्यावर उभी केली जातात. ज्यामुळे विशेषतः संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी निर्माण होते. अपघात होण्याची शक्यता आहे.मोठी आहे. संपूर्ण रस्ता या मॉल च्या ग्राहकांनी व्यापलेला असल्याने इतर वाहने अडकून पडू लागली आहेत. हा रास्ता त्या मॉल चालकाने विकत घेतलेला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
अनेक ग्राहक कार ने येतात आणि आपापली वाहने रस्त्यावर उभी करतात. तसेच मागची बाजू न पाहता फक्त कारचे दरवाजे उघडले जातात ज्यामुळे सर्वात वाईट घटना घडू शकतात. ग्राहकांना रस्त्यावर वाहने पार्क करण्याची परवानगी दिली कुणी आणि हे कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे? असे नागरिक विचारत आहेत.
मॉल मालकांनी ग्राहकांची वाहने त्यांच्या स्वत:च्या आवारात उभी करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. तसेच रहदारी पोलिसांनी आणि महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे ही मागणी आहे.