बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्याची लवकरच विभाजन केले जाणार असून बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण या मतदार संघाचा संयुक्तपणे एक स्वतंत्र तालुका निर्माण केला जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव येथे आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगावमध्ये नूतन जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव आहे. या नव्या कार्यालयाच्या उभारणीसाठी यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असून त्यासाठी अजून 200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या प्रकल्पाबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे.
बेळगावच्या रिंग रोडला शेतकऱ्यांचा विरोध असणे स्वाभाविक आहे. कारण त्यामध्ये त्यांची शेतजमीन जाणार आहे. तथापि रिंग रोड हा बेळगाव शहरासाठी अत्यावश्यक असल्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले. प्रत्येक राज्य सरकारच्या काळात कर्नाटक राज्योत्सव दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळ्या दिनाचे आचरण केले जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी योग्य तो क्रम घेतील.
दुसरीकडे यामुळे सर्वांना संरक्षण देणे हेच पोलिसांचे काम झाले आहे. राज्योत्सव दिनी काळ्या दिनाचे आचरण करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्याच्या विभजनासंदर्भात बोलताना जिल्ह्याचे विभाजन होणार हे निश्चित आहे. आपल्या जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता हा विषय अग्रक्रमावर आला असून टप्प्याटप्प्याने चर्चा करून जिल्ह्याच्या विकासासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगून लवकरच बेळगाव तालुक्याचे विभाजन केले जाईल.
हे विभाजन करताना बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा एक स्वतंत्र तालुका निर्माण केला जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले.