बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात खळबळ माजवलेल्या आणि हजारो ठेवीदारांचा पैसा हडप केलेल्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या, संचालकांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश सरकारने बजावला आहे. त्यानुसार संचालकांच्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता आणि बँकांतील 32 खात्यातील पैसे जप्त करण्यात आले आहेत.
संगोळी रायण्णा सोसायटीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सीआयडी पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने दिलेल्या अहवालानुसार सोसायटीचे अध्यक्ष आनंद अप्पुगोळ यांच्या संचालकांनी लोकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून पैसे जमा केले.
त्यातून विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात ठेवीदारांची फसवणूक झाली असल्याचा अहवाल दिला आहे.
ठेवीदारांचा पैसा परत देण्यासाठी ठेवीदार आणि आर्थिक आस्थापन कायदा 2004 नुसार संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या नावाची सर्व मालमत्ता, विविध बँकांतील खात्यातील रक्कम याशिवाय अध्यक्ष, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकाच्या नावे असलेली मालमत्ता, त्यांच्या विविध खात्यातील रक्कम जप्त करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर विशेष न्यायालयाचा निकाल येऊपर्यंत सरकारने नियुक्त केलेल्या विशेष अधिकार्याकडे ही मालमत्ता आणि रक्कम जप्त असणार आहे.
सरकारने जप्त केलेल्या मालमत्तांत बागेवाडी येथील 1 एकर 33 गुंठे, कंग्राळी केएच येथील 16 गुंठे, मण्णूर येथील 3 एकर 25 गुंठे, मण्णूर येथील 9 एकर, मण्णूर येथील 10 गुंठे, हनुमाननगर येथील 2600 चौ.फू.चा फ्लॅट, साईनगर येथील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.
संजय भरमनाथ पाटील, प्रेमा आनंद अप्पुगोळ आणि महांतेश देमाप्पा अंगडी यांच्या नावे ही मालमत्ता होती. तर संगोळ्ळी रायण्णा सोसायटी, शिवमूर्ती सत्याप्पा चिवनगोळ, प्रेमा आनंद अप्पुगोळ, संजय पाटील, आनंद अप्पुगोळ यांच्या नावावर विविध बँकांत असलेल्या 32 खात्यातील 35 लाख 50 हजार 934 रूपये जप्त करण्यात आले आहेत.
क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सोसायटीमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे सहकार खात्याला मोठा धक्का बसला आहे. गेल्या सात वर्षांपासून या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे ठेवीदारांना आपले पैसे कधी मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.