बेळगाव लाईव्ह -बेळगावकरांच्या दृष्टीने एक अतिशय भव्य असा उपक्रम दरवर्षी रोटरी क्लब बेळगावच्या वतीने आयोजित केला जातो तो म्हणजे अन्नोत्सव.
यंदा हा उत्सव 5 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत सीपीएड कॉलेजच्या भव्य अशा मैदानावर होणार आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगावचे चेअरमन रो. जयदीप सिद्धनावर यांनी बोलताना दिली.
अन्नोत्सवाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अन्न ही प्रत्येकाची गरज आहे आणि वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची खाण्यापिण्याची आवड असते.
बेळगावात सर्व समाजाचे आणि देशाच्या विविध भागातून आलेले लोक राहत असल्याने त्यांची खाण्यापिण्याची आवड सुद्धा वेगवेगळी आहे. या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1997 साली रोटरी क्लब ने सर्वप्रथम “अन्नोत्सव” उपक्रमाची सुरुवात केली.
रोटरीचे अविनाश पोतदार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने यशाची ऊंची गाठत अन्नोत्सव ला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले आहे.
संजीव कपूर ,विठ्ठल कामत, विष्णू मनोहर ,सई ताम्हणकर ,गायक अमिता गुप्ता यासारख्या प्रख्यात सेलिब्रिटीजनी भेट देऊन आजवर अन्नोत्सवाचे कौतुक केले आहे. अन्नोत्सव हा जरी रोटरी क्लबचा उपक्रम असला तरी बेळगावकरांच्या आवडीचा तो उत्सव झाला आहे.
या उत्सवात देशाच्या विविध भागातून येणारे दोनशेहून अधिक स्टॉल सहभागी होणार असून त्यामध्ये काश्मीर पासून जयपुर पर्यंत, गोवा, कोल्हापूर ,सातारा,पुणे, नवी दिल्ली येथील प्रख्यात खाद्यपदार्थाचे स्टॉल सहभागी होणार आहेत. यंदाचे अन्नोत्सवाचे 26 वे वर्ष असून या इव्हेंटचे चेअरमन म्हणून रो. डॉक्टर संतोष पाटील व सुनिष मैत्रानी आणि कम्युनिटी सर्विस डायरेक्टर म्हणून रो. तुषार पाटील हे कार्यरत आहेत.
याहीवर्षी अन्नोत्सवामध्ये 200 स्टॉल्स बरोबरच भव्य अशा स्टेजची उभारणी करण्यात येणार आहे ज्या स्टेजवर रोज वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. नागरिकांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन यावर्षी पार्किंगसाठी भव्य अशी सोय करण्यात आली आहे. .याशिवाय स्टॉल ओनर साठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात मोठी एल ई डी स्क्रीन बरोबरच 15 मोठे कियाक्स बसवले जाणार आहेत. स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी प्रसाधन व्यवस्था करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे.
आजवर रोटरी क्लब ने शाळा ,स्वच्छतागृह, ॲम्बुलन्स, नेत्रपेढी, त्वचा पेढी, डायलिसिस केंद्र, पोलिओ व्हॅक्सिनेशन साठी रेफ्रिजरेटर आणि आर्टिफिशियल लिम्बस साठी अर्थसहाय्य केले आहे .यंदाच्या या अन्नोत्सवातून मिळणारा निधी संपूर्णतः बेळगावसाठीच खर्च केला जाणार आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यातून राबवले जाणार आहेत. अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दहा दिवसात दीड ते दोन लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे. स्टॉलची बुकिंग 15 नोव्हेंबर पासून सूरु झाले असल्याचे कळविण्यात आले आहे