Tuesday, January 7, 2025

/

राज्योत्सवाच्या नावाखाली शहर वेठीस?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दरवर्षी प्रशासनाकडून श्री गणेशोत्सव, श्री शिवजयंती मिरवणुकीमध्ये एकतर डीजे साऊंड सिस्टीमला परवानगी नाकारली जाते किंवा एक टॉप दोन बेसची सक्ती केली जाते. मात्र राज्योत्सव मिरवणुकीमध्ये मात्र या नियमाचे उल्लंघन करून तो पायदळी तुडवण्यात आल्याचे आढळून आले असून संबंधितांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाईचे धाडस होणार का? हा प्रश्न आहे. राज्योत्सवाच्या नावाखाली काल बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत डीजेचा दणदणाट करत शहरात अक्षरशः धुडगूस घालण्यात आला. यावेळी पोलिसांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने डीजे वापरण्यास निर्बंध घातले आहेत अशी कारणे सांगून श्री गणेशोत्सव व श्री शिवजयंती मिरवणुकांमध्ये पोलिसांकडून मराठी भाषिकांवर दबाव टाकत डिजे साऊंड सिस्टीम वर बंदी घातली जाते. इतकेच नव्हे तर संबंधित मंडळावर आणि डीजे मालकावर गुन्हे दाखल करण्यासह डीजे जप्त करण्यापर्यंत पोलिसांची मजल जाते.

तथापि काल राज्योत्सव मिरवणुकीच्या नावाखाली कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या आवाजावर धिंगाणा घालून शहरवासीयांना वेठीस धरण्यात आले होते. राजोत्सव मिरवणुकीत सर्व नियम धाब्यावर बसवून आवाजावर मर्यादा न ठेवता धडकी भरणाऱ्या मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आल्यामुळे वृद्ध व रुग्णांना त्रास सहन करावा लागला. ‘बेळगाव आपले आहे’ हे दाखवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कर्नाटक सरकारचा खटाटोप सुरू आहे. स्थानिक कन्नड लोकांनी पाठ फिरवल्यामुळे परराज्यातून लोकांना आणून बेळगावमध्ये राज्योत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी देखील मूठभर कन्नड संघटनांना पैशाचे आमिष दाखवून यावेळचा राज्योत्सव साजरा करण्यात आला.

राज्योत्सवाच्या मुख्य मिरवणुकीला चन्नम्मा चौकातून सुरुवात झाली. तेथून काकती वेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, कॉलेज रोड मार्गे लिंगराज कॉलेज मैदान असा मिरवणुकीचा मार्ग होता. मात्र रस्त्यावरून मनमानी पद्धतीने चित्ररथ नेण्यात आल्याने रहदारी व्यवस्थेवर परिणाम झाला होता. त्याचबरोबर काही अतिउत्साही कन्नड कार्यकर्त्यांकडून झेंडे मिरवत आरडाओरड करण्याबरोबरच डीजेच्या तालावर बिभत्स नाचत धिंगाणा घालण्यात आला. थोडक्यात उत्सव काळासह मराठी नागरिकांच्या कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे कारण पुढे करत डीजेवर निर्बंध घातले जातात.

राज्योत्सव दरम्यान मात्र अशा कोणत्याच नियमांचे पालन करण्यात येताना दिसत नव्हते. राज्योत्सव मिरवणुकीसाठी यंदा बेळगाव दाखल झालेल्या बहुतांश डीजे सिस्टीम महाराष्ट्रातील होत्या. पुणे आणि परिसरातून आलेल्या या डीजे चालकांनी कन्नड बरोबरच मराठी ही गाणी वाजवली. त्यामुळे या रिमिक्स गाण्याच्या तालावर कन्नडीगांना नाचावे लागत होते

मिरवणुकीमध्ये स्थानिकांपेक्षा परगावच्या भाडोत्री कन्नड कार्यकर्त्यांचा अधिक भरणा असल्यामुळे त्यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे चन्नम्मा चौकात जाहिरात फलक लावण्यावरून कन्नड संघटनांच्या नेत्यांमध्ये वादावादीच्या घटनाही घडल्या. त्याचप्रमाणे चन्नम्मा चौक ते काकती वेसपर्यंत पेंडाल घालतानाही राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्ते व कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्याचप्रमाणे दुपारी नाचण्यावरून कन्नड कार्यकर्त्यांच्या दोन गटात वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यामुळे कांही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

त्यानंतर पुन्हा मिरवणूक पूर्ववत झाली. एकंदर काल राज्योत्सवाच्या नावाखाली शहराला वेठीस धरण्याबरोबरच मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टिमच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. आता यावर पोलीस प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ सोयीस्कर भूमिका घेणार? का चुकीला माफी नाही असे म्हणत गणेशोत्सव शिवजयंती आणि दसरा उत्सवाप्रमाणे कारवाई करणार? हे पहावे लागणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.