बेळगाव लाईव्ह ;तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने ह्युमॅनिटी फाउंडेशन बेळगावतर्फे शहरांमध्ये आयोजित तृतीयपंथीयांचा लक्षवेधी ‘प्राईड वॉक’ आज सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला.
कॅम्प येथील संचयनी सर्कल येथून प्राईड वॉक या जनजागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या हस्ते प्राईड वॉकचे उद्घाटन झाले. संचयनी सर्कल येथून सवाद्य निघालेल्या या प्राईड वाॅक अर्थात जनजागृती रॅलीची धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कल, कृष्णदेवराय सर्कलमार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सांगता झाली.
याप्रसंगी बोलताना तृतीयपंथीयांच्या नेत्या किरण बेदी यांनी प्राइड वॉक हा आमच्या स्वाभिमानी वाटचालीचे प्रतीक आहे. समाजाला आम्ही काय आहोत हे दाखवण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विविधतेत एकता जपणाऱ्या आम्हा सर्वांना समाजाने सन्मानाने वागवले पाहिजे असे सांगून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही सर्व तृतीयपंथी एका ठिकाणी जमून आमचा स्वातंत्र्य दिन एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतो अशी माहिती दिली.
अन्य एका तृतीय पंथीयाने बेळगाव मध्ये 500 हून अधिक तृतीयपंथीय आहेत. आम्हा सर्वांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सरकारी सुविधा मेळाव्यास हव्यात. सर्व क्षेत्रात आम्हाला समान दर्जा मिळावयास हवा, असे सांगितले. ह्युमॅनिटी फाउंडेशनतर्फे आयोजित आजच्या प्राईड वॉकमध्ये बहुसंख्येने सहभागी झालेले तृतीयपंथी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.