बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कुडची रोडवरील पोतदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे इंग्लंडमधील नामवंत क्रीडा व्यक्तिमत्व आणि जगातील अव्वल फ्रीस्टाइल फुटबॉलपटू जीमी नाईट यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलांसाठी आयोजित फ्रीस्टाइल फुटबॉल कार्यशाळा आज उत्साहात पार पडली.
पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर आयोजित या फ्रीस्टाइल फुटबॉल कार्यशाळेमध्ये शाळेतील फुटबॉलची आवड असलेल्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता. या मुलांना इंग्लंडचे नामांकित व्यावसायिक फ्रीस्टायलर फुटबॉलपटू जिमी नाईट यांनी फुटबॉल मधील विलक्षण युक्त्या दाखवून त्या त्यांच्याकडून गिरवून घेतल्या. पोतदार इंटरनॅशनल नेटवर्कच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून कार्यशाळेचा हा उपक्रम राबविण्यात आला.
फ्रीस्टाइल फुटबॉल शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसीत करण्यास मदत करते, यावर जीमी नाईट यांचा ठाम विश्वास आहे. पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमधील खेळाबद्दल इतका उत्साह, प्रतिभा आणि आवड पाहून खूप आनंद झाल्याचे जिमी नाईट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लहान वयात शालेय मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी फ्रीस्टाइल फुटबॉल कार्यशाळेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. भारतात मी 15 जानेवारी रोजी आलो, त्यानंतर आतापर्यंत या पद्धतीच्या पंधरा कार्यशाळांमधून सुमारे 15000 मुलांना मी फ्रीस्टाइल फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. एखाद्या खेळात पुढे येण्यासाठी मुलांना योग्य वयात संधी मिळाली पाहिजे.
तसेच त्यांना प्रोत्साहित करून त्या खेळाचे व्यासपीठ व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. असे झाल्यास जागतिक क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांच्या पंगतीत जाऊन बसण्यास भारताला वेळ लागणार नाही. मात्र यासाठी तळागाळातून प्रयत्न झाले पाहिजेत असे जिमी नाईट यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेप्रसंगी पोतदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोतदार, शाळेचे प्राचार्य राज लामणी आदी उपस्थित होते.
मॉन्टेरियल, क्युबेक, कॅनडा येथे 24 डिसेंबर 2004 साली जन्मलेले जीमी नाईट हे प्रोफेशनल फुटबॉलर फ्रीस्टाइल ॲथलिट असण्याबरोबरच इंग्लंडमधील सुप्रसिद्ध स्कूल वर्कशॉप कंपनी फ्रीस्टाइल फुटबॉल वर्कशॉपचे संस्थापक आहेत. फ्रीस्टाइल फुटबॉल मधील जगातील पहिल्या दहा क्रमांकांच्या खेळाडूंमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. गेल्या 15 वर्षापासून फ्री स्टाईल खेळाचे प्रशिक्षण देणारे जीमी नाईट यांच्या नावे दोन गिनीज बुक विक्रम आहेत. बेळगावला प्रथमच भेट देणारे जीमी जगातील सर्वांत अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक फुटबॉल फ्रीस्टाइलर्सपैकी एक आहे.
जीमी नाईट आणि त्यांच्या फ्रीस्टाइलर्स चमूने गेल्या 2017 पासून इंग्लंड मधील सुमारे 300 प्राथमिक शाळांना भेटी देऊन फ्रीस्टाइल फुटबॉलच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच जिमी त्यामधील विलक्षण युक्त्यादेखील शिकवतात. युवा पिढीने आरोग्यपूर्ण जीवनशैली जगावी, त्यांच्यात लवचिकता यावी आणि त्यांच्या मानसिकतेचा विकास व्हावा हा जिमी नाईट यांच्या फ्रीस्टाइल फुटबॉल कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जीमी यांचे नांव दोन वेळा नोंदविले गेले आहे. त्याचप्रमाणे 2016 ते 2018 या कालावधीत ते जगातील आघाडीच्या दहा फुटबॉलपटूंपैकी एक होते.
दुबई एक्स्पो 2020 च्या जाहिरातीमध्ये जगविख्यात फुटबॉलपटू लियोनी मेस्सी यांच्यासोबत ते झळकले होते. त्याचप्रमाणे 2017 व 2018 मध्ये लागोपाठ युईएफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यांमध्ये खेळणारे जीमी हे एकमेव फ्रीस्टायलर फुटबॉलपटू होते हे विशेष होय. अशा या महान क्रीडा व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शन पोतदार इंटरनॅशनल स्कूलमधील मुलांना लाभले.