कर्नाटक राज्य पर्यटन खात्याने म्हैसूर येथे ‘अंबारी’ डबलडेकर बस सेवा सुरू केली असून त्यातील एक बस बेळगावमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना लवकरच अंबारी बस मधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
बेळगाव ते सौंदत्ती येथील यल्लमा डोंगर या मार्गावर अंबारी डबलडेकर बस सोडण्याचा विचार सुरू आहे. याबाबत आवश्यक चाचपणी करण्यात येत असून पर्यटन खात्यातील अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवताच बस सेवेला प्रारंभ होणार आहे.
या संदर्भात येत्या 1 डिसेंबर नंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळात ही ‘अंबारी’ बस सुवर्ण विधानसौधच्या आवारात सेवेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर बस कांही दिवसांपूर्वी बेळगावात दाखल झाली असून मध्यवर्ती बस स्थानकात थांबवली आहे.
पर्यटन खात्याने एकूण सहा अंबारी बसेस पैकी बेळगाव आणि गदग जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक बस पुरवली आहे. अंबारी बसची उंची सुमारे 19 फूट असून बसवरील टपावर देखील आसन व्यवस्था आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सध्या सदर बससाठी बेळगावात अनुभवी चालत नसल्यामुळे म्हैसूर येथून कांही दिवसात अनुभवी चालकाला पाचारण केले जाणार आहे.