बेळगाव लाईव्ह:*”हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी”* या डॉ बाबा आमटे यांच्या काव्यपंक्ती प्रमाणे आज समाजामध्ये अनेक माणसं जीवनाच्या वाटा आणि नाती हरवलेली आहेत. आज देशभरात दिवाळीची धुमधाम व नवलाईची रेलचेल असताना काहींच्या जीवनात नशीबाचे उलटे फेरे आहे. बऱ्याच जनांच्या ताटात दिवाळी निमित्त पंचपक्वान्नं भरलेली असताना काही माणसांना उपाशी पोटी झोपावं लागतं हे वेदनादायी सत्य कितीही केलं तरी झाकत नाही.
माणसांनी माणसा सारखं वागावं आनंद द्यावा आनंद घ्यावा, या कल्पना पुस्तकाच्या पानापानात वाचताना मस्त वाटतात पण प्रत्यक्षात खूप कठीण असतात. माणूसकीची भावना हरवलेलं जगात कोण कोणाचा नसतो अशा परिस्थितीत मराठा मंडळाच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपेक्षितांसोबत प्रेम जिव्हाळा आणि आपुलकीचा सेतू बांधण्याचं काम केलं. आपल्या सोबत उपेक्षित समाजाचीही दिवाळी साजरी झाली पाहिजे हा हेतू डोक्यात ठेवून मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराजू (हलगेकर) यांनी कोरोना महामारीत केलेलं अन्नदानाचे अनमोल कार्य डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यार्थिनींनी आपल्या घरात तयार असलेले गोडधोड पदार्थ एकत्रित केले, ते पदार्थ खानापूर रेल्वे पटरीवर, बसस्थानकावर शिवाय इतर ठीकाणी वास्तव्यास असणाऱ्या अनाथ लोकांना वाटप केले.
हे सारं करत असताना उपेक्षित लोकांच्या चेहऱ्यावरचे बोलके भाव खूप काही सांगून गेले,त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विद्यार्थिनीचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करून गेला. आपला हा मदतीचा हात अनेकांचे प्रेरणास्थान बनवा हीच या विद्यार्थ्यांनींची अपेक्षा होती.
विद्यार्थ्यांनीच्या या उपक्रमाला प्रा. मनिषा यलजी, प्रा. श्री एन एम सनदी, प्रा.श्री टी आर जाधव, प्रा. श्री एन ए पाटील,प्रा श्री एम आर मिराशी, प्रा प्रज्ञा पारकर प्रा श्री आय सी सावंत, प्रा जयश्री शिवठणकर व प्रा श्रीमती मंगल देसाई यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाला कार्यकारी संचालक श्री परशुराम अण्णा गुरव व श्री शिवाजीराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू (हलगेकर) यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले असून प्राचार्य श्री अरविंद पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.