बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य प्रमुख नेतेमंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे.
मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या सोमवार दि. 4 डिसेंबर 2023 रोजी आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, समन्वयक मंत्री शंभूराज देसाई, सीमाप्रश्न तज्ञ कमिटी अध्यक्ष धैर्यशील माने, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तशा आशयाची निमंत्रण पत्रे उपरोक्त मान्यवरांना धाडली आहेत. निमंत्रण पत्रामध्ये 1956 सालच्या भाषावार प्रांत रचनेमुळे सीमा भागातील मराठी भाषिकांवर कसा अन्याय झाला? सीमा प्रश्न कसा निर्माण झाला? हे थोडक्यात नमूद करण्यात आले आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी खाजगी संस्थेच्या जागेत सन 2006 पासून सरकारचे विधिमंडळ अधिवेशन घेण्यास सुरुवात केली.
त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध बांधून आपला हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू केला. मराठी जनतेवर विविध तऱ्हेने अन्याय सुरू केले आहेत. मराठी भाषेत कोणतेही कागदपत्र न देणे, वेगवेगळ्या कारणास्तव मराठी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य अंध:कारमय करणे, महाराष्ट्रीय नेत्यांना बेळगाव देण्यास प्रतिबंध घालणे इत्यादी गोष्टी कर्नाटक सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
बेळगाव जवळील सुवर्णसौधमध्ये ज्यावेळी कर्नाटक सरकार अधिवेशन घेते. त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेळगावात मराठी जनतेच्या मेळाव्याचे आयोजन करून महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट केली जाते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांची नेतेमंडळी यापूर्वी सन 2006 साली महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील यांनी हजर राहून सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे असे वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे ग्रामविकास व अर्थमंत्री जयंतराव पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार महाडिक यांनी बंदी हुकूम मोडून महामेळाव्यास उपस्थिती दर्शवली आहे.
कै. एन. डी. पाटील यांनी आजारी असताना देखील प्रत्येक महामेळाव्यास उपस्थित राहून मराठी जनतेला मोठा आधार दिला होता. येत्या 4 डिसेंबर 2023 ला बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. त्या दिवशीच्या मेळाव्यास महाराष्ट्र सरकारच्यावतीने मंत्रिमंडळाचे सदस्य, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून सीमावासियांचा आवाज बुलंद करावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे, अशा आशयाचा तपशील महाराष्ट्रातील नेतेमंडळींना धाडण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे. या पत्रावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.