बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारचे अधिवेशन जवळ येऊ लागताच कन्नड संघटनांना चेव चढू लागला असून 15-20 जणांच्या करवे कार्यकर्त्यांच्या टोळक्याने कन्नड सक्तीची मागणी करत निदर्शने करून रस्त्या शेजारील जाहिरातींचे फलक, होर्डिंग फाडून टाकल्याची घटना आज गुरुवारी सकाळी राणी चन्नम्मा चौक येथे घडली.
कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सकाळी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे आंदोलन छेडून धुडगूस घातला वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चौकातील रस्त्याशेजारी लावलेले विविध व्यापारी आस्थापने आणि कंपन्यांचे इंग्रजीतील जाहिरात फलक फाडून टाकले.
कन्नड सक्तीची मागणीची घोषणाबाजी करत आवार भिंत आणि होर्डिंगवर चढून वेदिकेचे कार्यकर्ते धुडगूस घालत असताना पोलिसांनी मात्र त्यांना अटकाव करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले. अखेर जाहिरात फलक आणि होर्डिंगचे नुकसान करण्यास पुरेसा वेळ दिल्यानंतर जणू बेळगाव आपल्या मालकीचेच आहे अशा अविर्भावात वावरणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आश्चर्य म्हणजे करवे कार्यकर्त्यांचा धुडगूस घालून झाल्यानंतर झाल्यानंतर फाडाफाडीमुळे दयनीय अवस्था झालेल्या होर्डिंग व जाहिरात फलकांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
दरम्यान, भर चौकात कोणतीही पूर्वकल्पना न देता करवे कार्यकर्त्यांनी घातलेल्या या धुडघुसामुळे राणी चन्नम्मा चौकातील वाहतुकीस मात्र कांही काळ अडथळा निर्माण झाला होता.