बेळगाव लाईव्ह:दोघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे लष्कराने बंद केलेले सैनिकनगर, लक्ष्मीटेक रस्त्यावरील फाटक (गेट) सर्वांच्या सोयीसाठी तात्काळ खुले करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल कर्नाटक एक्स -सर्व्हिसमन असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सकाळी मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील सैनिकनगर येथील रहिवाशांनी आज मंगळवारी सकाळी अखिल कर्नाटक एक्स -सर्व्हिसमन असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष बसप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात सैनिक नगर येथील रहिवासी असलेल्या माजी जवानांसह त्यांची बायका, मुले हातात तिरंगे ध्वज घेऊन सहभागी झाली होती. मोर्चादरम्यान जय जवान जय किसान, भारत माता की जय, अखिल कर्नाटक एक्स -सर्व्हिसमन असोसिएशनचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सांगता होऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर करण्यापूर्वी आपल्या मागणीसंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना अखिल कर्नाटक एक्स -सर्व्हिसमन असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष बसप्पा तळवार म्हणाले की, सैनिकनगरमध्ये आम्ही सर्व आजी-माजी सैनिक आमच्या कुटुंबीयांसमवेत राहतो. आम्हा बहुतांश सैनिकांची मुले ही सैनिक स्कूलमध्ये तर इतर मुले खाजगी शाळांमध्ये शिकतात. या मुलांसह आम्ही एक्स सर्व्हिसमन आणि आमच्या कुटुंबीयांना शहरात ये-जा करण्यासाठी लक्ष्मीटेक रस्त्यावरील लष्कराच्या हद्दीत असलेल्या गेटचा वापर करावा लागतो. लष्कराच्या सुविधा घेण्यासाठी देखील आम्हाला त्याच गेटद्वारे जावे लागते. मात्र सध्या लष्करी अधिकाऱ्यांनी ते गेट बंद केले आहे. या गेट परिसरात राहणारे तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी (एफडीए) संतोष शिरगावी आणि निखिल पाटील हे दोघेजण आमच्याशी गैरवर्तन करत असल्यामुळे आम्ही हे गेट बंद केले आहे असे स्पष्टीकरण लष्करी अधिकारी देत आहेत.
त्या दोघांना लष्करी अधिकाऱ्यांशी व्यवस्थित आदराने वागण्यास सांगा मग आम्ही भेट पुर्ववत खुले करतो असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याखेरीज निखिल पाटील यांनी सहा कुत्री पाळली आहेत. ही कुत्री आर्मी एरियामध्ये मोकाट फिरून क्वार्टर्स समोर घाण करत असतात. याबाबत लष्करी जवान अथवा अधिकाऱ्यांनी जाब विचारल्यास पाटील त्यांच्याशी अर्वाच उद्धट भाषेत बोलतात. थोडक्यात शिरगावी आणि पाटील यांच्या गैरवर्तनामुळे मुख्य रस्त्यावरील गेट बंद करण्यात आले असले तरी त्यामुळे सैनिकनगर मधील आम्हा रहिवाशांची विशेष करून शाळेला जाणाऱ्या मुलांची मोठी गैरसोय होत आहे.
आम्हा सर्वांना अन्य मार्गाने 7 -8 कि.मी. अंतराचा मोठा वळसा घालून ये -जा करावी लागत आहे. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून संतोष शिरगावी आणि निखिल पाटील या सरकारी कर्मचाऱ्यांना समज द्यावी. त्यांच्या गैरवर्तनास आळा घालावा जेणेकरून लष्करी अधिकारी लक्ष्मी टेक रस्त्यावरील गेट खुले करतील आणि आम्हा सर्वांना दिलासा मिळेल, असे बसप्पा तळवार यांनी सांगितले.