बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारच्या बेळगाव येथील या संस्थेमधील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणावरील चर्चा रंगू लागल्या आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील बहुतांश कर्मचारी वर्षानुवर्षे त्या ठिकाणीच तळ ठोकून आहेत. या सर्वांनीच प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची वरिष्ठ मंडळी किंवा सीईओच नव्हे तर वरपासून खाली कार्यालयीन शिपायापर्यंत सर्वांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले असल्याचे बोलले जात आहे. अगदी हॉस्पिटलच्या सुविधांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डच्या शाळांमधील नियुक्त्या तसेच बोर्डाची किंवा बोर्डाच्या हद्दीतील शासकीय कामे, कंत्राटे वगैरे या सर्वांमध्ये भ्रष्टाचार हा ठरलेला आहे असा आरोप देखील या निमित्ताने केला जात आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डातील भ्रष्टाचारामध्ये प्रामुख्याने दोघा बड्या अधिकाऱ्यांचा हात आहे. भ्रष्टाचार करण्यात हे अधिकारी मातब्बर झाले असून त्यांनी करोडोची माया जमविली आहे. सध्या सुरू असलेली सीबीआय चौकशी लक्षात घेता या अधिकाऱ्यांच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांची सीबीआयने चौकशी केली पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील साधे साधे कर्मचारी देखील गडगंज झाले असल्याची देखील चर्चा या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने समोर आली आहे.
दरम्यान, डिफेन्स इस्टेट ऑफिसर व बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के. आनंद यांच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासांती के. आनंद यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दरवाजाला आतून कडी लावण्यात आली होती असे सांगून प्राथमिक तपासात घातपाताच्या कोणत्याही खुणा घटनास्थळी आढळलेल्या नाहीत असे त्यांनी सांगितले. मृत्यूपूर्वी आनंद यांनी कांही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली होती का? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यासंदर्भात नंतर माहिती देईन असे पोलीस उपायुक्त म्हणाले. के. आनंद हे 2015 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी होते.
घटनास्थळी कोणी जबरदस्तीने घुसल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. एकंदर उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल. मयताच्या तामिळनाडू येथील नातलगांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त जगदीश यांनी दिली.